Join us  

नोटाबंदी - मोठ्या रकमा भरणारे गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 3:31 AM

नोटाबंदी अथवा त्यानंतरच्या काळात मोठमोठ्या रकमा बँक खात्यांवर जमा करणाºया व्यावसायिक संस्थांची कॉर्पोरेट बँक खाती आता आयकर खात्याच्या टार्गेटवर आली आहेत.

मुंबई : नोटाबंदी अथवा त्यानंतरच्या काळात मोठमोठ्या रकमा बँक खात्यांवर जमा करणाºया व्यावसायिक संस्थांची कॉर्पोरेट बँक खाती आता आयकर खात्याच्या टार्गेटवर आली आहेत. या संस्थांना नोटिसा बजावण्याची मोहीम आयकर खात्याने हाती घेतली आहे. मोठ्या रकमा भरणाºया व्यक्तींना आयकर विभागाने याआधीच नोटिसा बजावल्या आहेत.आयकर विभागाच्या मुंबई येथील कार्यालयात कार्यरत असलेल्या एका अधिकाºयाने सांगितले की, गेल्या सोमवारपासून व्यावसायिक संस्थांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यात प्रमुख ज्वेलर्स, हिºयांचे व्यापारी, कापड व्यापारी आणि जमीन-जुमला विकासक यांचा समावेश आहे. कॉर्पोरेट बँक खात्यांत ज्यांनी मोठ्या रकमा नोटाबंदीच्या काळात जमा केल्या होत्या त्यांच्याकडे आता त्याचा हिशेब मागण्यात येत आहे. या टप्प्यातील नोटिसांमध्ये मोठ्या माशांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अधिकाºयाने सांगितले की, ज्यांनी ज्यांनी विनाखुलाशाच्या रकमा बँक खात्यांत भरल्या आहेत, त्यांना त्यांना नोटिसा मिळाल्या आहेत. ई-मेलद्वारे या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिसांची संख्या कित्येक लाख असू शकते.वरिष्ठ लेखा परीक्षक दिलीप लखाणी यांनी सांगितले की, ज्यांना रोख विक्री करण्यात आली, त्या ग्राहकांची नावे सादर करा, असे संस्थांना सांगण्यात आले आहे. ओळख पटविण्यात आलेले ग्राहक आणि ओळख न पटविण्यात आलेले ग्राहक, अशी विभागणी करण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे. या ग्राहकांकडे पॅन क्रमांक आहे की नाही, याचीही विचारणा करण्यात आली आहे. ओळख पटविलेल्या आणि पॅन क्रमांक असलेल्या ग्राहकांची पडताळणी आयकर खाते करणार आहे.