मुंबई : म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांच्या लाभांशाच्या रकमेची इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (इएलएसएस) पुनर्गंुतवणूक करू नये, अशा सूचना असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंडस् आॅफ इंडियाने दिल्या आहेत.ईएलएसएसमध्ये आत्तापर्यंत वृद्धी आणि लाभांश असे दोन पर्याय देण्यात येत आहेत. यामध्ये लाभांशाच्या पुनर्गुंतवणुकीचा पर्यायही होता. त्याअंतर्गत लाभांशाची रक्कम पुन्हा गुंतविली जात होती. यासाठी लॉक इन कालावधी तीन वर्षांचा आहे. आता असा पर्याय असोसिएशनच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे राहणार नाही.यासंदर्भात सेबी आणि असोसिएशन यांच्यात चर्चा झाली. याशिवाय असोसिएशनच्या संबंधित समितीनेही याबाबत आढावा घेतला. त्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम राहू नये यासाठी असा पर्याय बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे.आता नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या गुंतवणूकदारांना लाभांशाची रोख रक्क्म नको असेल, त्यांना लाभांश हस्तांतरण पर्यायाचा विचार करता येईल. त्यानुसार अशा गुंतवणूकदारांचा लाभांश म्युच्युअल फंडाच्या ओपन एंडेड योजनांमध्ये गुंतविला जाईल. काही म्युच्युअल फंडांनी याबाबतची कार्यवाही सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
लाभांशाच्या रकमेची पुनर्गुंतवणूक नको
By admin | Updated: January 17, 2015 01:13 IST