नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे देशातील वस्तू उत्पादन क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. डिसेंबरमध्ये कारखाना उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. कंपन्यांच्या पर्चेसिंग मॅनेजर्स सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. निक्केई मार्केट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सचा (पीएमआय) अहवाल सोमवारी जारी झाला. त्यानुसार, डिसेंबरमध्ये वस्तू उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक ४९.६ अंकांवर राहिला. नोव्हेंबरमध्ये तो ५२.३ अंकांवर होता. हा निर्देशांक ५0 अंकांच्या खाली राहिल्यास मंदी दर्शवितो, तसेच ५0 च्या वर राहिल्यास तेजी दर्शवितो. डिसेंबर २0१५ नंतर भारताचा पीएमआय पहिल्यांदाच ५0 च्या खाली आला. आयएचएस मार्केटचे अर्थतज्ज्ञ तथा या अहवालाच्या लेखिका पॉलियाना लिमा यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये भारतीय कारखाना क्षेत्र तेजीत होते. २0१६ च्या अखेरीस या क्षेत्राचा निर्देशांक संकुचित झाला आहे. भारत सरकारने पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे कंपन्यांना रोख रकमेची समस्या भेडसावत आहे. त्याचा हा परिणाम आहे. खरेदी आणि रोजगार यावरही नोटाबंदीचा परिणाम झाला आहे. डिसेंबरमध्ये पीएमआय घसरला असला तरी आॅक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत त्यात वाढच झाली आहे. आॅक्टोबरमधील तेजीचा लाभ त्याला झाला आहे. आगामी तीन महिन्यांत काय स्थिती राहील, याबाबत मतभिन्नता निर्माण झाली आहे. नोटांची उपलब्धता कशी असते, यावर सगळे काही अवलंबून राहील, असे सूत्रांनी सांगितले. नोटांची उपलब्धता वाढल्यास स्थिती सामान्य होईल. नोटांची टंचाई कायम राहिल्यास मात्र कारखाना उत्पादनात वाढ होणे अशक्य आहे, असे जाणकारांनी सांगितले. आपल्या व्यवहारांसाठी रोखविरहित यंत्रणांचा वापर करायला लागणे कारखान्यांसाठी सोपे नाही, असेही जाणकारांनी सांगितले.
नोटाबंदीमुळे कारखाना उत्पादनात मोठी घसरण
By admin | Updated: January 3, 2017 03:05 IST