Join us  

मोदी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट; १ एप्रिलपासून आठवड्यातून फक्त ४ दिवस काम करा अन्...

By प्रविण मरगळे | Published: February 09, 2021 9:45 AM

New Labour Codes त्याशिवाय मंत्रालयाकडून असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी एक इंटरनेट पोर्टल तयार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअंसघटित कामगारांची नोंदणी आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या सुविधांची माहिती दिली जाणार आहे.नव्या कायद्यानुसार सरकारने ४ दिवसात कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यात काम करण्याची मर्यादा ४८ तासांची आहे.

नवी दिल्ली – नव्या कामगार कायद्यानुसार येणाऱ्या कालावधीत कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ३ दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने चार नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत त्याच्याशी संबंधित नियमांना या आठवड्यात अंतिम स्वरूप प्राप्त करून देणार आहे. हे कायदे अंमलात आल्यानंतर देशात कामगार धोरणांमध्ये नवीन प्रणालीला सुरुवात होणार आहे.

या मसूद्यावर शेवटचा हात फिरवणं सुरु असून त्यानंतर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ४ दिवस काम आणि उर्वरित ३ दिवस सुट्टीचा पर्याय मिळणार आहे. त्याशिवाय मंत्रालयाकडून असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी एक इंटरनेट पोर्टल तयार करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जून महिन्यापर्यंत हा पोर्टल तयार होईल. यावर अंसघटित कामगारांची नोंदणी आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या सुविधांची माहिती दिली जाणार आहे. या माध्यमातून श्रमिक कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशा वेब पोर्टलबाबत भाषणात उल्लेख केला होता.

कंपनी आणि कर्मचाऱ्यांनी निर्णय घ्यावा

केंद्र सरकारने आणलेल्या या पर्यायावर कंपनी आणि कर्मचारी निर्णय घेऊ शकतात. नव्या कायद्यानुसार सरकारने ४ दिवसात कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना १२ तास काम करावे लागेल. आठवड्यात काम करण्याची मर्यादा ४८ तासांची आहे. त्यामुळे १२ तास काम केल्यास ४ दिवस काम करून ३ दिवस सुट्टी देता येऊ शकते.

१ एप्रिल २०२१ पासून नवीन ४ कामगार कायदे लागू होणार

कामगार सचिव अपूर्व चंद्र म्हणाले की, कामगार कायद्याच्या नियमांना अंतिम रूप दिलं जातं आहे, येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याबाबत सर्वांशी चर्चा करण्यात आली आहे. लवकरात लवकर कामगार कायदे लागू करण्यात येतील, यात वेतन कायदा, औद्योगिक निगडीत कायदा, सुरक्षा, आरोग्य कायदा, सामाजिक सुरक्षा कायद्याचा समावेश आहे. कामगार मंत्रालयाने या ४ कायद्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून लागू करण्याची योजना बनवली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा होऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढणार आहे. याचा फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६१ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना १७ टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात ४ टक्क्यांनी वाढ होऊन त्यांना २१ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :कामगारकेंद्र सरकार