बाजारपेठेला नवी दिशा कायापालट : जुन्या पारंपरिक दुकानांचे रुपडे बदलले, ब्रँडेड मार्केट वाढलेऔरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील बाजारपेठेने काळाच्या ओघात कात टाकून नवीन रुपडे धारण केले आहे. एकेकाळी जुन्या पारंपरिक पद्धतीची दुकाने होती, तिथे मोठमोठ्या चकचकीत शोरूमची निर्मिती झाली. सर्व व्यवहार संगणकावर आला. एवढेच नव्हे तर मागील पाच ते दहा वर्षांत राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय ब्रँडेडने आपले मोठे मार्केट येथे उभे केले. शहरवासीयांना मॉलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा मिळू लागली. स्वातंत्र्यपूर्व काळात औरंगाबाद हे शहर देशातील व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले होते. मागील पाच ते दहा वर्षांपासून पुन्हा औरंगाबादेतील व्यापार क्षेत्राचे विकासाचे नवीन पर्व सुरू झाले. शहराचे हृदयस्थान असलेला गुलमंडी, शहागंज परिसर व मोंढा हीच पूर्वी मुख्य बाजारपेठ होती. मात्र, शहराचा चोहोबाजूंनी विस्तार होत गेला आणि बाजारपेठेची व्याप्तीही वाढत गेली. मागील १० वर्षांच्या काळात ऐतिहासिक पारंपरिक बाजारपेठेला आधुनिकतेची झालर चढली. आज शहरात पारंपरिक व आधुनिक व्यापाराचे अनोखे मिश्रण असलेली संस्कृती पाहावयास मिळत आहे. शहरातील पारंपरिक बाजारपेठ म्हणजे गुलमंडी, पैठणगेट, टिळकपथ, औरंगपुरा, कुंभारवाडा, रंगार गल्ली, मछली खडक, भांडी बाजार, कासारी बाजार, सिटीचौक, शहागंज, राजा बाजार, जाधवमंडी, मोंढा, दिवाणदेवडी, रोशनगेट, बुढीलेन, चेलीपुरा हा परिसर मानला जातो. नवीन बाजारपेठेत निराला बाजार, उस्मानपुरा, सिडको कॅनॉट प्लेस, जालना रोड, हडको, गारखेडा परिसर, जवाहर कॉलनी, सूतगिरणी परिसर, काल्डा कॉर्नर इ. परिसराचा समावेश होतो. शहरात मागील १० वर्षांत काही मॉल आले आणि बाजारपेठेकडे पाहण्याचा शहरवासीयांचा दृष्टिकोन बदलून गेला. आज शहरात पारंपरिक व्यवसाय करणारे आणि आधुनिक पद्धतीने व्यवसाय करणारे, अशा दोन्ही संस्कृतींचे मिलन पाहावयास मिळत आहे. शहराचा विस्तार झाला, तशी येथील व्यापार्यांची संख्याही वाढली. जिल्हा व्यापारी महासंघातून मिळालेल्या माहितीनुसार १० वर्षांपूर्वी शहरात १४ ते १५ हजार व्यापारी होते. आजघडीला ही संख्या २६ ते २७ हजारांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. डीएमआयसी व स्मार्टसिटीमुळे भविष्यात आणखी ३ ते ४ हजार नवीन व्यापारी निर्माण होतील. यामुळे येथील बाजारपेठेतील स्पर्धा आणखी वाढेल. त्याचा अंतिमत: फायदा शहरवासीयांनाच होणार आहे. (जोड)
व्यापार क्षेत्राच्या विकासाचे नवे पर्व
By admin | Updated: August 26, 2014 01:48 IST