बीजिंग : ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) पुढील वर्षी एप्रिलमध्ये पहिले कर्ज देणार असून ते रेनमिनबी या चिनी चलनात असेल. बँकेचे अध्यक्ष के. व्ही. कामत यांनी ही माहिती गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ही बँक २१ जुलै रोजी शांघायमध्ये सुरू झाली. आपल्या सदस्य देशांमधील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना ही बँक कर्ज देईल. बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामत यांनी गुरुवारी प्रथमच चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांची भेट घेतली. ब्रिक्स देशांत परस्परांमधील सहकार्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल अशा शब्दांत केकियांग यांनी बँकेच्या उद््घाटनाच्या दिवशी म्हटले होते. या बँकेची स्थापना होण्याचा अर्थच येता काळ हा विकसनशील देशांचा आहे असा होतो, असे कामत म्हणाले. विकसनशील देश आता स्वत:च्या पायावर उभे राहू शकतील व कर्जासाठी स्वत:ला संघटित करायचा प्रयत्न करतील. नडीबी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेसोबत काम करील, असेही ते म्हणाले.
एनडीबी पहिले कर्ज देणार चिनी चलनात
By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST