Join us  

भारतीय बँकांमध्ये ठेवींपेक्षा कर्ज वितरण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 2:02 AM

कर्ज पुरवठा १२.६४ टक्क्यांनी वाढला, ठेवींची वाढ ७.६१ टक्के

मुंबई : बँकांच्या कर्ज वितरणातील वाढ ठेवींपेक्षा अधिक झाली आहे. ११ मे रोजी संपलेल्या पंधरवड्यात कर्ज पुरवठा १२.६४ टक्क्यांनी वाढला. त्याचवेळी ठेवी मात्र ७.६१ टक्क्यांनी वाढल्या.रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, देशातील बँकांनी २७ एप्रिल ते ११ मेदरम्यान ८५.५१ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. याच काळात मागीलवर्षी हा आकडा ७५.९० लाख कोटी रुपये होता. २७ एप्रिलला संपलेल्या पंधरवड्यातील कर्ज वाटप ८५.३८ लाख कोटी रुपये होते.बँकांमधील एकूण ठेवींचा विचार केल्यास, ११ मे रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकांमधील ठेवींमध्ये मागीलवर्षीपेक्षा ७.६१ टक्क्यांची वाढ झाली. २७ एप्रिल ते ११ मेदरम्यान बँकांमधील ठेवी ११३ लाख कोटी रुपयांवर गेल्या. याच कालावधीत मागीलवर्षी हा आकडा १०५ लाख कोटी रुपये होता. २६ एप्रिलला संपलेल्या पंधरवड्यात ठेवींमध्ये ८.२० टक्के वाढ झाली होती.२७ एप्रिल ते ११ मेदरम्यान ८५.५१ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले.मार्च २०१७ मध्ये कृषी क्षेत्राच्या कर्ज वितरणात १२.४ टक्क्यांची वाढ झाली. मार्च २०१८ मध्ये मात्र ही वाढ ३.८ टक्केच राहिली. मार्च ते मे हा काळ पीक कर्ज वाटपासाठी महत्त्वाचा असतो. उद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जातही घट झाली आहे. मार्च २०१७ मध्ये उद्योगांसाठीच्या कर्ज वितरणात १.९ टक्के वाढ झाली होती. ती वाढ यावर्षी मार्च महिन्यात ०.७ टक्केच झाली.

टॅग्स :शेती