Join us  

मोदी सरकारला मोठा दिलासा; कोरोना संकटातून बाहेर येणाऱ्या देशासाठी आनंदाची बातमी

By कुणाल गवाणकर | Published: November 12, 2020 6:07 PM

देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येणार; मूडीजचा अंदाज

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा फटका बसलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी आहे. रेटिंग एजन्सी मूडीजनं भारताच्या जीडीपी वाढीचा दर उणे ८.९ टक्के इतका राहील, असा अंदाज वर्तवला आहे. याआधी मूडीजनं जीडीपी वृद्धीचा वेग उणे ९.६ टक्के इतका असेल असा अंदाज व्यक्त केला होता. गेल्या आर्थिक तिमाहीत जीडीपी उणे २३ टक्क्यांहून अधिक घसरला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येत असल्याचं मूडीजच्या अंदाजावरून समोर आलं आहे.पुढील वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी सुधारेल, असं भाकीत मूडीजनं वर्तवलं आहे. पुढील वर्षी जीडीपी वाढीचा वेग ८.१ टक्के राहील असा अंदाज वर्तवणाऱ्या मूडीजनं आता ८.६ टक्के वेगानं जीडीपी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मूडीजनं आज 'ग्लोबल मॅक्रो आऊटलूक २०२१-२२' अहवाल प्रसिद्ध केला. त्यात भारतीय अर्थव्यवस्थेची येत्या काही महिन्यांतील परिस्थितीवर विस्तृत भाष्य करण्यात आलं आहे.भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं मूडीजनं अहवालात म्हटलं आहे. 'भारतातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे वाहतूक, दळणवळणावरील निर्बंध कमी झाले आहेत. देशातील कोरोना संक्रमणाचा दर ५ टक्क्यांच्या खाली गेला आहे. त्यामुळे येणाऱ्या तिमाहीत आर्थिक व्यवहार वाढतील, अशी अपेक्षा आहे. मात्र अर्थक्षेत्र कमजोर झाल्यानं व्याजाच्या सुविधांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्यास थोडा वेळ लागेल,' असं मूडीजनं अहवालात नमूद केलं आहे.'कोरोना रुग्णांच्या संख्येत अशाच प्रकारे घट होत राहिल्यास अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर होईल. त्याचसोबत विकासकामांना सुरुवात झाल्यास २०२१ आणि २०२२ मध्ये कोरोनाचं महत्त्व कमी होईल. त्याचवेळी कोरोना लस सर्वांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू झाल्यास अर्थव्यवस्थेला फायदा होईल,' असा अंदाज मूडीजनं वर्तवला आहे. जगाची अर्थव्यवस्था कशी वाढणार हे कोरोनावर अवलंबून असेल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास अर्थव्यवस्थेवरील मळभ दूर होईल, असं मूडीजनं म्हटलं आहे. 

टॅग्स :अर्थव्यवस्थाकोरोना वायरस बातम्या