Join us

मनी पानासाठी - दसरा-दिवाळीत जाहीरातींवर होणार दोन हजार कोटींचा खर्च

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST



दसरा-दिवाळीत जाहीरातींवर होणार दोन हजार कोटींचा खर्च
मुंबई - अर्थकारणात सुधार आल्याचे संकेत मिळू लागल्यानंतर आगामी काळात व्यवसायवृद्धीसाठी विविध क्षेत्रातील कंपन्यांनी जाहीरात आणि एकूणच प्रमोशन कॅम्पेनसाठी तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती एका सर्वेक्षण कंपनीच्या अहवालाद्वारे पुढे आली आहे.
ओनम, दसरा, दिवाळी या सणांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. तसेच, उत्पादन कंपन्याही मोठ्या प्रमाणावर सूट योजना जाहीर करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या दोनवर्षांपासून मंदीचे सावट असल्याचे ग्राहकांमध्येही काही प्रमाणात निरुत्साह दिसून आला होता. मात्र, आता परिस्थितीमध्ये सुधार दिसून येत असल्यानेे याचा फायदा घेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी पुन्हा एकदा पैसे खर्च करण्याची तयारी सुरू केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, दुचाकी आणि चारचाकी वाहन कंपन्यांनी सुमारे ४०० ते ४५० कोटी, ई-कॉमर्स कंपन्यांतर्फे अडीचशे ते तीनशे कोटी, दूरसंचार कंपन्या (हँडसेट निर्मात्या आणि सेवा पुरविणार्‍या) यांच्याकडून दोनशे ते अडीचशे, तर रिटेल कंपन्यांतर्फे १५० ते २०० कोटी रुपयांचे बजेट निश्चित झाल्याची माहिती आहे. सर्वात जास्त बजेट हे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचे असून या कंपन्या अंदाजे ९५० ते एक हजार कोटी रुपये जाहीरातबाजीवर खर्च करू शकतात. वर्षामध्ये या क्षेत्रातील कंपन्यांतर्फे जो व्यवसाय होतो, त्यापैकी ४० ते ५० टक्के व्यवसाय हा सणासुदीच्या कालावधीमध्ये होतो. त्यामुळे या कालावधीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या जाहीरातबाजीसाठी खर्च होणार आहे.
(प्रतिनिधी)