Join us  

मोबाइल बँकिंग ६० हजार कोटींच्या पुढे

By admin | Published: March 18, 2016 2:07 AM

स्मार्टफोनची वाढती संख्या आणि इंटरनेटचा वाढता वेग या दोन्ही गोष्टी बँकिंग उद्योगाच्या पथ्यावर पडल्या असून, यामुळे आर्थिक वर्षात मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून विक्रमी

- मनोज गडनीस,  मुंबईस्मार्टफोनची वाढती संख्या आणि इंटरनेटचा वाढता वेग या दोन्ही गोष्टी बँकिंग उद्योगाच्या पथ्यावर पडल्या असून, यामुळे आर्थिक वर्षात मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून विक्रमी ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. विशेष म्हणजे, हे व्यवहार रोखीऐवजी ई-पद्धतीने झाल्यामुळे किमान १०० कोटी रुपयांच्या व्यवहार खर्चाची बचत झाली आहे. बँकिंग व्यवहार जलद होतानाच ग्राहकांना बँकेत ज्या-ज्या सुविधा उपलब्ध होतात, त्या सर्व सुविधा मोबाइलद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर डिजिटल व मोबाइल बँकिंग प्रकारावर जोर देण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: बँकांनी अनेक मोबाइल हँडसेट व सेवा देणाऱ्या कंपन्यांनी करार करीत ही सेवा अधिक सुलभ केल्यामुळे याचा वापर वाढला आहे. मोबाइल बँकिंगची विश्वासार्हता वाढविण्यासाठी बँकांनी आता विशेष मोहीम सुरू केली असून, इंटरनेट बँकिंगमध्ये असलेल्या सर्वच बँकांनी आता स्वत:ची ‘अ‍ॅप’ सुरू केली आहेत. तसेच प्रत्येक व्यवहाराकरिता सुरक्षेच्या विविध पातळ्या निर्माण केल्यामुळे हॅकिंगची शक्यता अतिशय कमी झाली आहे. यामुळे लोकांचा कल वाढला आहे. विशेष म्हणजे मोबाइल बँकिंग या प्रकारात खाजगी बँकांच्या तुलनेत देशातील सरकारी बँका अग्रेसर आहेत. उपलब्ध माहितीनुसार, देशातील सर्वांत मोठी बँक असा लौकिक असलेल्या स्टेट बँकेने मोबाइल बँकिंगमध्येही पहिला क्रमांक कायम राखला असून, या क्षेत्रात बँकेची बाजारातील हिस्सेदारी ३६ टक्के आहे. वर्षभरात मोबाइल बँकेच्या माध्यमातून स्टेट बँकेच्या ग्राहकांनी तब्बल १७,६३६ कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत. देशातील सर्व बँकांनी मिळून मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी ६० हजार कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत. आॅनलाइन अथवा मोबाइलवरून व्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणावर व्यवहार खर्चात बचत झाली आहे.ई-कॉमर्सलाही चालना- स्मार्टफोनच्या प्रसारानंतर आता अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या अ‍ॅपच्या प्रसारावर जोर दिला आहे. अ‍ॅपद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिक सूट देण्याच्या योजना आखल्या आहेत. - अशा व्यवहारांना सुरक्षा कवच देण्यासाठी या कंपन्यांनी अनेक बँकांशी करार केला आहे. यामुळे बँकेच्या अ‍ॅपद्वारे सुरक्षित व्यवहार पूर्ण होत आहे. याचाही फायदा मोबाइल बँकिंगचा वापर वाढण्याच्या रूपाने दिसत आहे.