Join us  

लघु उद्योगांना नोटाबंदीचा फटका; रोजगार निर्मितीही घटली

By admin | Published: January 24, 2017 12:43 AM

लघु आणि मध्यम उद्योगांना नोटाबंदीचा फटका बसला आहे. रोजगार निर्मितीवरही याचा नकारात्मक परिणाम झाला आहे.

नवी दिल्ली : लघु आणि मध्यम उद्योगांना नोटाबंदीचा फटका बसला आहे. रोजगार निर्मितीवरही याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. तर, मोठ्या संघटित क्षेत्रात दीर्घ काळासाठी फायदा झाला आहे, असे मत उद्योग मंडळ असोचेमने व्यक्त केले आहे. असोचेम आणि बिझकॉनच्या एका सर्व्हेक्षणातून काही मुद्दे प्रकर्षाने समोर आले आहेत. यात म्हटले आहे की, कॉर्पोरेट क्षेत्राला दीर्घ काळासाठी या निर्णयाचा फायदा झाला आहे. ८१ टक्के जणांनी असे मत व्यक्त केले आहे की, लघु व मध्यम उद्योगांवर नोटाबंदीचा नकारात्मक परिणाम झाला आहे. ६६ टक्के लोकांनी गुंतवणुकीबाबत असमर्थता दाखविली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अंतिम तिमाहीत विक्रीत घट दिसू शकते, असेही यात म्हटले आहे. असोचेमचे महासचिव डी. एस. रावत म्हणाले की, काही क्षेत्रावर याचा परिणाम दिसत आहे. तर, काही क्षेत्र यातून बचावले आहेत. कृषी, खते, सिमेंट, अ‍ॅटोमोबाईल, टेक्सटाईल्स, रिअल इस्टेट क्षेत्रात याचा नकारात्मक प्रभाव पडला आहे. तर, उर्जा, तेल आणि गॅस, औषधे,आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रावर याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.