Join us  

मेहुल चोकसी, ‘गीतांजली’विरुद्ध दुसरे आरोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 4:12 AM

पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १३,४०० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या महाघोटाळ्याप्रकरणी बुधवारी सीबीआयने ज्वेलर मेहुल चोकसी आणि अन्य १७ जण व संस्थांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १३,४०० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या महाघोटाळ्याप्रकरणी बुधवारी सीबीआयने ज्वेलर मेहुल चोकसी आणि अन्य १७ जण व संस्थांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. चोकसीच्या गीतांजली उद्योग समूहावरही आरोपपत्र दाखल झाले आहे.मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले. गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, फसवणूक या आरोपांसह व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली आरोप ठेवले आहेत.या आधी १४ मे रोजी सीबीआयने नीरव मोदी व इतरांवर एक आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, आजचे आरोपपत्र वेगळे आहे. चोकसीविरोधातील एफआयआरनुसार हे आरोपपत्र दाखल केले आहे. पुरवणी आरोपपत्रही लवकरच दाखल केले जाईल. चोकसीविरोधात १३ फेब्रुवारी रोजी पीएनबी घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. १४३ हमीपत्रे (एलओयू) व २२४ विदेशी कर्ज पत्रे यांच्या आधारे बँकेची ४,८८६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. मेहुल चोकसी आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांनी केलेल्या घोटाळ्यात बँकेला १३,४०० कोटींपेक्षाही अधिक फटका बसला आहे.>गोकुळ शेट्टीला १ कोटी रुपयेसीबीआयच्या आरोपपत्रानुसार, मेहुल चोकसी याच्या कंपन्यांना हमीपत्रांच्या आधारे कर्ज देण्याच्या बदल्यात पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाउस शाखेचा तत्कालीन उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याला चोकसीच्या कंपन्यांकडून तब्बल १ कोटी रुपये मिळाले. चोकसीच्या कंपन्यांना देण्यात आलेली हमीपत्रे उघड होऊ नये, यासाठी शेट्टी आणि त्याच्या साथीदारांनी षड्यंत्र रचले. हमीपत्रांची नोंदणी बँकेच्या संदेश व्यवस्थेत केलीच नाही. त्याऐवजी आंतरराष्ट्रीय संदेश यंत्रणा स्विफ्टमार्फत ही हमीपत्रे विदेशातील बँकांना पाठविली गेली.