मुंबई : जगात दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनने आपल्या युआन या चलनाचे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत केलेले २ टक्के अवमूल्यन आणि भक्कम चिनी अर्थव्यवस्थेत झालेला मंदीचा शिरकाव याचे धक्के सोमवारी जगभरातील बाजारपेठांनी अनुभवले. भारतीय शेअर बाजारात तर या धक्क्यांच्या तीव्रतेने घसरणीच्या तांडवाची अनुभूती घेतली. एकदिवसीय कामगिरीतील १,६२४.५१ अंकांची घसरण नोंदवित सेन्सेक्स बाजार बंद होतेवेळी सेन्सेक्स २५,७४१ अंशांवर स्थिरावला. या घसरणीचा तडाखा इतका मोेठा होता की, गुंतवणूकदारांचे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ७ लाख कोटी रुपये बुडाले. एकीकडे बाजारात गडगडाट सुरू असतानाच दुसरीकडे रुपयातही तब्बल ८९ पैशांची घसरण होत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ६६ रुपये ४३ पैशांची दोन वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर महागाईचा पुन्हा भडका उडेल.गेल्या आठवड्यात युआनचे अवमूल्यन केल्यानंतर चीनतर्फे आणखी अवमूल्यन होण्याचे संकेत मिळत असून, यामुळे रुपयात आणखी पडझड अपेक्षित आहे. सेन्सेक्सची इंट्रा-डे घसरण १,७४१.३५ अंकांची होती. ही २१ जानेवारी २00८नंतरची सर्वांत मोठी इंट्रा-डे घसरण ठरली आहे. आजच्या पडझडीमुळे सरकार आणि रिझर्व्ह बँक सतर्क झाली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भीती दूर करण्याचा प्रयत्न करत भारतीय बाजारांचा पाया मजबूत असल्याची ग्वाही दिली आहे. (प्रतिनिधी)महागाईचा भडका उडणारआंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व व्यवहार हे प्रामुख्याने अमेरिकी डॉलरमध्ये होतात. परंतु, आता डॉलरच्या पुढे रुपयाने नांगी टाकल्याने महागाईचा भडका उडेल. अन्नधान्यापासून जीवनशैलीच्या विविध वस्तू महागतील. जीवनशैलीशी निगडित अशा सुमारे ९० प्रमुख गोष्टी भारत आयात करतो. या सर्व किमती भडकताना दिसतील. महाग होणारे काही प्रमुख घटक - कच्चे तेल, डाळी, खाद्य तेल, औषधे, खते, वर्तमानपत्रांचा कागद, साबणाचे रसायन, शॅम्पू, सोने, शैक्षणिक कर्जाचे हप्ते, परदेशी प्रवास आणि पर्यटन, वाहने, परदेशी खाद्यप्रकार, टीव्ही, मोबाइल अशा विविध घटकांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे.का झाली घसरण?चिनी अर्थव्यवस्थेतील मंदीच्या शिरकावामुळे आशियातील बहुतांश बाजारांत मोठी घसरण. त्याचा फटका भारतीय बाजारालाही बसला.डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरण, परिणामी भारतीय अर्थकारणातील अस्थिरतेची शक्यता.१० पैकी ७ वेळा घसरण सोमवारीभारतीय शेअर बाजारात झालेल्या घसरणीच्या प्रमुख १० घटनांचा वेध घेतला तर त्यापैकी ७ वेळा झालेली घसरण ही सोमवारीच झाल्याचे दिसते. त्यामुळे अशा सोमवारचा उल्लेख बाजारात ‘ब्लॅक मंडे’ असा केला जातो.सहा तासांत ७ लाख कोटी बुडाले२०१० ते २०१३ या मंदीच्या प्रदीर्घ फेऱ्यानंतर सप्टेंबर २०१३ रोजी भारतीय शेअर बाजारात तेजीने प्रवेश केला. यानंतर अपवाद वगळता सरत्या २३ महिन्यांत सातत्याने भारतीय शेअर बाजारात तेजीचाच संचार होता. मात्र, सोमवारच्या या घसरणीत गुंतवणूकदारांच्या समभागांत महाकाय घसरण झाल्याने गुंतवणूक मूल्यात ७ लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. बाजाराचे भांडवल मूल्य १00 लाख कोटींच्या खाली येऊन ९५,३३,१0५ कोटी झाले.वर्षाखेरीपर्यंत रुपया सत्तरी गाठणार?चीनने आपल्या चलनात २ टक्क्यांचे अवमूल्यन केल्याने अमेरिकी डॉलर वगळता बहुतांश चलनांच्या किमतीत डॉलरच्या तुलनेत घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात ८९ पैशांची घसरण होत रुपयाने ६६.४३ची पातळी गाठली आहे. परंतु, चीनकडून त्यांच्या चलनात आणखी अवलमूल्यन होण्याचे संकेत मिळत असून, असे झाल्यास वर्षाखेरीपर्यंत भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ७० रुपयांची पातळी गाठेल. मे महिन्यापासून रुपयाच्या मूल्यात १३ टक्के घसरण झाली आहे. सोने चमकलेभांडवली बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा सोने-चांदी व्यवहारांकडे मोर्चा वळविला आणि या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती पुन्हा वधारल्या. सोन्याच्या किमतीत प्रति तोळा ३६५ रुपये तर चांदीच्या किमतीत १ हजार रुपयांची वाढ झाली.11कंपन्या बाजारात ५२ आठवड्यांच्या नीचांकावर..शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा फटका अनेक महाकाय कंपन्यांना बसला असून, ३० कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्स श्रेणीतील ११ कंपन्यांच्या समभागांनी ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.जागतिक अर्थकारणातील अस्थिरतेचा परिणाम भारतीय शेअर बाजाराच्या कामगिरीवर दिसून आला आहे. परंतु, भारतीय अर्थव्यवस्थेची देशांतर्गत स्थिती मजबूत असून, शेअर बाजारातील ही स्थिती तात्पुरती आहे.- अरुण जेटली, केंद्रीय वित्तमंत्रीरुपयाच्या मूल्यात दोन वर्षांची नीचांकी घसरण झाली असली तरी काळजी करण्याचे कारण नाही. देशाची गंगाजळी ३५५ अब्ज अमेरिकी डॉलरच्या साठ्यासह मजबूत आहे. गरज भासेल तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करेल.- डॉ. रघुराम राजन, गव्हर्नर, भारतीय रिझर्व्ह बँक
शेअर बाजारात तांडव!
By admin | Updated: August 25, 2015 05:54 IST