Join us  

श्रीगोंदा येथील बाजारपेठेत पोहोचले मद्रासी लिंबू!

By admin | Published: March 29, 2015 11:19 PM

श्रीगोंदा बाजार समितीच्या लिंबू केंद्रावर दोन दिवसांपूर्वी १० टन मद्रासी लिंबांची आवक झाली. मात्र, मद्रासी लिंबांपेक्षा श्रीगोंद्यातील साईसरबती लिंबाने चांगलाच

बाळासाहेब काकडे, श्रीगोंदाश्रीगोंदा बाजार समितीच्या लिंबू केंद्रावर दोन दिवसांपूर्वी १० टन मद्रासी लिंबांची आवक झाली. मात्र, मद्रासी लिंबांपेक्षा श्रीगोंद्यातील साईसरबती लिंबाने चांगलाच भाव खाल्ला. श्रीगोंद्यात मद्रासी लिंबांची आवक म्हणजे आॅनलाईन मार्केटप्रणालीची किमया आहे.श्रीगोंदा तालुका हा लिंबोणी बागांचे माहेरघर. श्रीगोंद्याचे लिंबू मुंबईच्या मार्केटमध्ये विकले जात होते; परंतु श्रीगोंदा बाजार समितीने श्रीगोंद्यात लिंबू खरेदी केंद्र सुरू केले आणि आॅनलाईन मार्केटप्रणालीमुळे श्रीगोंद्यातील लिंबू थेट देशातील मुख्य शहरातील बाजारपेठेत पोहोचले. त्यातून लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळण्यास मदत झाली.श्रीगोंदा येथील लिंबू खरेदीचे भाव इंटरनेट व व्हाटस् अ‍ॅपच्या माध्यमातून देशभर पोहोचले. त्याचा परिणाम म्हणून तामिळनाडूतील मद्रासी लिंबाचा एक ट्रक श्रीगोंदा मार्केटमध्ये आला आणि व्यापारी, शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या. व्यापारी आदिनाथ वांगणे यांनी या लिंबांचा लिलाव केला. मात्र, श्रीगोंद्याच्या लिंबांपुढे मद्रासी लिंबांचा महिमा चालला नाही. साईसरबतीच्या तुलनेत ५ रुपये किलोप्रमाणे कमीच भाव निघाला. स्थानिक लिंबू ५० ते ५५ रुपये, तर मद्रासी लिंबू ४५ ते ५० रुपये किलोप्रमाणे विकले गेले.