भारतातील जीवन विमा क्षेत्राने सलग दुसऱ्या महिन्यात दोन अंकी वाढ कायम ठेवली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये नव्या व्यवसायाचा हप्ता (प्रीमियम) वार्षिक आधारावर १२.१ टक्के वाढून ३४,००७ कोटी रुपये झाला.
‘केअरएज रेटिंग्ज’नं अहवालात ही माहिती दिली आहे. ही वृद्धी ऑगस्टमधील ५.२ टक्के घसरणीनंतरची मोठी सुधारणा आहे. वैयक्तिक नॉन-सिंगल पॉलिसींच्या प्रीमियममध्ये झालेली लक्षणीय वाढ ही आरोग्यदायी गुंतवणुकीचे द्योतक आहे.
ही वाढ का झाली?
ही वाढ प्रामुख्याने वैयक्तिक विभागातील, विशेषतः नॉन-सिंगल प्रीमियम पॉलिसींच्या मजबूत विक्रीमुळे झाली आहे. त्यामुळे नियमित गुंतवणुकीची मागणी वाढत असल्याचं दिसून येत आहे. वैयक्तिक जीवन विमा उत्पादनांवरील जीएसटी कपातीमुळेही विमा क्षेत्राची वाढती गती टिकून आहे.
एलआयसीनं आपलं स्थान कायम राखलं
भारतीय आयुर्विमा विमा महामंडळान (एलआयसी) आपलं अग्रस्थान कायम ठेवलं असून, खासगी कंपन्यांनीही दोन अंकी वाढ नोंदवली. जीवन व आरोग्य विम्यावर जीएसटी रद्द झाल्यानं विक्रीला मोठा वेग आला आहे. उद्योग आता पुन्हा दोन अंकी वाढीकडे परतला असून, मागणी सुधारत आहे. विमा उद्योग अनुकूल नियम, उत्पादनांची ऑफर, डिजिटलसह मजबूत वितरण जाळ्याच्या माध्यमातून ही सकारात्मक वाढ कायम ठेवेल.
