मुंबई : ‘अच्छे दिन’येण्याचे स्वप्न दाखवीत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचा तसे म्हटले तर पहिलाच अर्थसंकल्प शनिवारी (दि. २८) लोकसभेमध्ये सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाकडून बाजाराच्या मोठ्या अपेक्षा असून त्या पूर्ण झाल्यास बाजार मोठ्या प्रमाणात उसळी घेऊ शकतो. करात कपात, आयकर मर्यादेमध्ये वाढ या नेहमीच्याच अपेक्षा असल्या तरी त्याच्या जोडीला अर्थसंकल्पीय तूट कमी करणे, आर्थिक सुधारणांचे दिलेले आश्वासन पूर्ण करणे आदी अपेक्षाही बाजार बाळगून आहे.भाजप सत्तेवर आल्यानंतर अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात आपण आर्थिक सुधारणांना अधिक चालना देण्याचा प्रयत्न करू, असे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा शेअर बाजार आणि सर्वसामान्यही लावून बसले आहेत. अर्थमंत्र्यांकडून बाजाराच्या असलेल्या अपेक्षांचा हा वेध. अर्थसंकल्पामध्ये या अपेक्षा पूर्ण झाल्यास बाजारात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तेजी येऊ शकते. मात्र या अपेक्षांची पूर्तता न झाल्यास बाजारावर नकारात्मक परिणामही होऊ शकतो. असे झाल्यास अर्थव्यवस्थेसाठी योग्य ठरणार नाही अर्थमंत्र्यांच्या पोतडीत यापैकी काय काय दडलेले आहे, ते लवकरच दिसून येईल. (प्रतिनिधी)
बाजाराच्या अर्थमंत्र्यांकडून मोठ्या अपेक्षा
By admin | Updated: February 28, 2015 00:15 IST