नवी दिल्ली: संघटित क्षेत्रातील कोट्यवधी कामगार-नोकरदारांना आरोग्य विम्याचे संरक्षण देणाऱ्या कामगार राज्यविमा महामंडळास (एसिक) सेवाकरातून पूर्वलक्षी प्रभावाने वगळून केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात तब्बल ७.३०० कोटी रुपयांचा दिलासा दिला आहे.‘कामगार राज्य विमा महामंडळाने १ जुलै २०१२ पूर्वी पुरविलेल्या सेवा सेवाकराच्या कक्षेतून पूर्वलक्षी परिणामाने वगळण्यात येत आहेत, असे जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केल्याने महामंडळास हा दिलासा मिळाला आहे. य्केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या सेवा सेवाकरातून वगळण्यात आल्या त्यांची (निगेटिव्ह लिस्ट) यादी मंत्रालयाने १ जुलै २०१२ रोजी प्रसिद्ध केली होती. तरीही ही यादी पश्चातलक्षी प्रभावी आहे व ‘एसिक’ महामंडळाला त्याआधीच्या काळासाठी सेवाकर भरावा लागेल, अशी भूमिका सेवाकर आयुक्तालयाने घेतला होता. आता वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केलेल्या पूर्वलक्षी तरतुदीमुळे सेवाकराचा हा ससेमिरा कायमचा दूर होणार आहे.सेवाकर विभागाने ‘एसिक’ महामंडळावर तथ्ये दडविल्याचा आणि कर बुडविण्याचा मानस असल्याचा आरोप करून एकूण ७,३०० कोटी रुपयांचा सेवाकर, व्याज व दंड भरण्याच्या दोन स्वतंत्र नोटिसा बजावल्या होत्या. यापैकी एक नोटीस वर्ष २००५-०६ ते २००९-१० या काळातील सेवाकर व त्यावरील व्याज यापोटी ३,४०० कोटी रुपये भरण्यासंबंधी होती. दुसरी नोटीस १,९५० रुपये दंडाची व वर्ष २०१०-११ ते माफी दिली जाईपर्यंतच्या काळासाठीच्या १,९०० कोटी रुपयांच्या सेवाकराची होती.(लोकमत न्यूज नेटवर्क)
कामगार राज्य विमा महामंडळास मिळाला ७,३०० कोटींचा दिलासा
By admin | Updated: July 16, 2014 01:56 IST