राम जाधव , जळगावजागतिक व राष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी घटल्याने, तसेच चीनने मोठ्या प्रमाणावर राखीव सोन्याची विक्री करण्यास सुरुवात केल्याने व अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने बुधवारनंतर पुन्हा एकदा शुक्रवारी जळगावात सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदली गेली़ जळगावच्या सराफा बाजारात गेल्या पाच वर्षातील हा सोन्याचा नीचांकी भाव ठरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले़आठवडाभरापूर्वी किरकोळ विक्रीचे २६,५०० वर असलेले भाव शुक्रवारी सायंकाळी २५,४५० पर्यंत उतरले होते़ त्यामुळे बाजारात ग्राहकांची खरेदी वाढल्याने पंधरवड्यापूर्वी केवळ २५ टक्क्यांवर असलेला सराफा व्यवसाय दोन दिवसात ५० टक्क्यांपर्यंत गेला आहे़गुरुवारी सोन्याचे भाव १०० रुपयांनी वधारले. मात्र शुक्रवारी लगेच सोन्याचे भाव उतरल्याने सराफा बाजारात दोन दिवसांपासून ग्राहकांची विशेष गर्दी दिसत आहे़ बाजारात खरेदी वाढली़़़साधारणत: पाच वर्षांपूर्वी सोन्याचे भाव २५ हजारांच्या दरम्यान होते़ सोने-चांदीच्या खरेदीसाठी खान्देशातील प्रसिद्ध असलेल्या जळगाव बाजारपेठेत सध्या भाव उतरल्याने सोन्या-चांदीची खरेदी जोमात होताना दिसत आहे़ गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनीच सोने-चांदीच्या खरेदीकडे पाठ फिरवली होती़ त्यामुळे यावर्षी हवी तशी खरेदी होत नव्हती़ शैक्षणिक खर्च व इतर महागाई वाढल्यानेही सर्वसामान्यांना सोन्यात गुंतवणूक करणे परवडत नव्हते़ मात्र आता सोने स्वस्त होत असल्याने ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढला आहे़सध्या उत्पादन खर्च २५ हजारांवर असल्याने यापेक्षा अजून भाव उतरण्याची शक्यता नाही़ त्यामुळे खरेदीदारांसाठी सोने-चांदी खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे़ मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सोन्याचे भाव खूपच कमी झालेले आहेत़ त्यामुळे मागील वर्षी सोने खरेदी केलेल्या ग्राहकांना मात्र उतरत्या दराने धडकी भरली आहे़ तसेच व्यापारीही यामुळे चिंताग्रस्त झालेले आहेत़
जळगावात सोने २५ हजार ४५० वर
By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST