Join us  

प्राप्तिकर परताव्यासाठी बँक खाते पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 5:45 AM

सार्वजनिक सूचना : परतावे देण्याचे काम सुरू होणार आज

नवी दिल्ली : यापुढे प्राप्तिकर परतावे केवळ ई-मोडनेच करदात्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय प्राप्तिकर विभागाने घेतला आहे. परतावे देण्याची प्रक्रिया मार्च महिन्यापासून सुरू होणार असून त्यासाठी बँक खात्याला पॅन क्रमांकाची जोडणी असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय कर परतावे करदात्यांना मिळणार नाहीत.

प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. सूचनेत म्हटले आहे की, यंदा करपरतावे केवळ ई-रिफंड पद्धतीने अदा केले जाणार आहेत. १ मार्च २0१९ पासून ही प्रक्रिया सुरू होईल. तुमचा परतावा तुम्हाला लवकरात लवकर मिळवायचा असेल, तर तुमच्या बँक खात्याला पॅन क्रमांक जोडून घ्या. परतावा प्राप्त करण्यासाठी बँक खाते हे बचत, चालू, रोख अथवा ओव्हरड्राफ्ट यापैकी कोणत्याही प्रकारचे असले तरी चालेल.

आतापर्यंत प्राप्तिकर परतावे हे करदात्यांच्या बँक खात्यात अथवा खात्यावर जमा होणाऱ्या धनादेशांच्या द्वारे दिले जात होते. करदात्याच्या श्रेणीनुसार याचा निर्णय होत असे. जे लोक प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) भरतात, त्यांच्यासाठी पॅन आणि आधार क्रमांकांची जोडणी अलीकडेच बंधनकारक करण्यात आली आहे. ३१ मार्चपूर्वी जोडणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पॅन आणि आधार यांची जोडणी नसल्यास प्राप्तिकर विवरणपत्र भरले जाऊ शकणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.वेबसाइटवरही पडताळणी शक्यप्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेत म्हटले आहे की, आपल्या बँक खात्याला पॅन क्रमांक जोडला आहे की नाही याची पडताळणी करदाते प्राप्तिकर विभागाच्या दोन वेबसाइटवर करणे शक्य आहे.