Join us  

सिमेंटची किंमत कमी होणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 5:32 AM

उत्पादन खर्चीक; टाकाऊ वस्तू वापरल्यास किमती घटू शकतात

मुंबई : उत्पादनाचा भरमसाट खर्च पाहता सिमेंटच्या किमती सध्या कमी होणे शक्य नाही. पण प्लॅस्टिकसह प्रत्येक टाकाऊ वस्तू सिमेंट उत्पादनासाठी कामी येऊ शकते. सिमेंट उत्पादनात टाकाऊ वस्तूंचा कच्चा माल म्हणून उपयोग केल्यास खर्चावर थोडे नियंत्रण आणता येईल. त्यासाठी सरकारने तसे धोरण तयार करावे, अशी मागणी सिमेंट उत्पादकांनी केली आहे.सिमेंट क्षेत्रात १६५ वर्षांपासून असलेल्या विका या फ्रान्सच्या कंपनीने मुंबईत विशेष टर्मिनल सुरू केले आहे. विका समूहाचे अध्यक्ष गी सिडोस, विका इंडियाचे अध्यक्ष मार्कस ओबर्ले व सीईओ अनुप कुमार सक्सेना यांनी या १२ लाख टन टर्मिनल क्षमतेच्या टर्मिनलचे उद्घाटन केले.या वेळी अनुप कुमार म्हणाले, सिमेंटचा सर्वांत छोटा कारखाना वर्षाला १० लाख टन उत्पादन काढतो. पण त्यासाठीसुद्धा १५०० कोटी गुंतवावे लागतात. कारखान्यात किमान १ हजार कर्मचारी अहोरात्र काम करतात. भांडवली गुंतवणूक, कारखाना चालविण्याचा खर्च व कर्मचारी वेतन गृहीत धरता नफा कमविण्यासाठी आठ वर्षे लागू शकतात. त्यादरम्यान सिमेंट कधी तोट्यात तर कधी ना नफा, ना तोटा तत्त्वाने विकावे लागते. सर्व खर्चांसह सिमेंटच्या एका पोत्याची किंमत वास्तवात १७०० रुपये होते. पण किरकोळ बाजारात एक पोते ३५० रुपयांना विकले जाते.सिमेंट भट्टीद्वारे ‘स्वच्छ भारत’ शक्यअनुप कुमार म्हणाले, ‘स्वच्छ भारत’ केवळ रस्त्यावर झाडू मारून होणार नाही. त्यासाठी टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट व्हायला हवी. सिमेंट तयार करण्यासाठी चुनखडी व कोळसा हे दोन प्रमुख घटक असतात. यापैकी कोळसा भट्टीला ऊर्जा देण्यासाठी वापरला जातो. आज तोही महागला आहे. पण टाकाऊ वस्तूंचा उपयोग केल्यास कोळशाचा खर्च कमी होऊ शकेल. प्लॅस्टिक, खराब झालेली औषधे व वैद्यकीय सामग्री, घन कचरा आदी वस्तू भट्टीसाठी वापरल्यास उत्पादनाचा खर्च कमी होऊ शकेल.

टॅग्स :व्यवसाय