नवी दिल्ली : फळे, भाज्या आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे मे महिन्यात ठोक महागाईचा दर ६.0१ टक्क्यांवर पोहोचला. हा गेल्या ५ महिन्यांतील उच्चांक ठरला आहे. एप्रिलमध्ये महागाईचा दर ५.२0 टक्के होता. मान्सून सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे खाद्य वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच इराकमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे. त्याचाही परिणाम महागाई वाढीवर होऊ शकतो. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ठोक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर वाढला आहे. मे महिन्यात बटाट्याच्या किमती आधीच्या वर्षाच्या तुलनेत ३१.४४ टक्के वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे फळे १९.४0 टक्के, तांदूळ १२.७५ टक्के महाग झाले आहेत. आधीच्या महिन्यात खाद्यवस्तूंची महागाई ९.५0 टक्के होती. निर्मित वस्तूंची महागाई ३.५५ टक्के होती. बार्कलेज इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सिद्धार्थ संन्याल यांनी सांगितले की, कमजोर मान्सूनचे भाकीत आणि इराकमधील भू-राजकीय संकटाने जागतिक पातळीवर तेलाच्या किमतीत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे महागाईची जोखी वाढली आहे. येणाऱ्या काळात याचा परिणाम दिसून येईल.ठोक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर एप्रिलमध्ये ५.२0 टक्के होता. गेल्या वर्षी तो ४.५८ टक्के होता. मार्च महिन्यातील आकड्यांत सुधारणा केल्यानंतर महागाईचा दर ६ टक्के झाला. आधी तो ५.७0 टक्के असल्याचे जाहीर करण्यात आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत बोलताना महागाई नियंत्रणात आणण्याचे अभिवचन देशवासीयांना दिले होते. आम्ही महागाई नियंत्रणात ठेवण्याचा वायदा केला आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, असे मोदी यांनी म्हटले होते. सूत्रांनी सांगितले की, मान्सून कमी राहणार असल्याच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर सरकारने खाद्यवस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आपत्कालीन योजना तयार करण्यास सुरुवात केली आहे. लोकमत न्यूज नेटवर्क)
महागाई पुन्हा वाढली
By admin | Updated: June 16, 2014 22:39 IST