IndiGo Refund Status Check: देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोचं (IndiGo) संकट संपुष्टात येण्याचं नाव घेत नाहीये. कंपनीनं प्रवाशांचे ८२७ कोटी रुपयांचे रिफंड केले आहेत आणि ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. इतकं असूनही, सरकारनं एअरलाइन विरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाशांना अद्याप रिफंड मिळालेला नाही, ते त्रस्त आहेत. फ्लाईट रद्द झाल्यामुळे प्रत्येकाला त्यांचे पैसे परत मिळतील, असं कंपनीनं स्पष्ट केलंय.
इंडिगोनं परत केले ८२७ कोटी रुपये
देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी ३ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान रद्द झालेल्या उड्डाणांसाठी रिफंड प्रक्रिया करत आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत ८२७ कोटी रुपये परत केले गेले आहेत आणि उर्वरित रिफंडवर प्रक्रिया सुरू आहे. इंडिगोनं माहिती दिली की, ४,५०० हून अधिक बॅग देखील प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत.
— IndiGo (@IndiGo6E) December 8, 2025
उड्डाणांच्या संख्येत वाढ
काही दिवसांपूर्वी इंडिगोची उड्डाणं सातत्यानं रद्द होत असल्यानं प्रवासी त्रस्त झाले होते. पण आता उड्डाणांचे संचालन हळूहळू सामान्य होत आहे. शनिवारी १,५६५ उड्डाणांनंतर, रविवारी १६५० आणि सोमवारी १८०० पेक्षा जास्त उड्डाणं संचालित करण्यात आली. एअरलाइन कंपनीनं हे देखील सांगितलं की, ते दररोज २ लाखाहून अधिक ग्राहकांना त्यांच्या विविध माध्यमांद्वारे सपोर्ट सेवा देत आहेत.
रिफंड स्टेटस कसं तपासावं?
१. सर्वप्रथम तुम्हाला goindigo.in/refund.html वर जावं लागेल.
२. यानंतर पीएनआर/बुकिंग संबंधित माहिती आणि ईमेल आयडी इत्यादी मागितलेले सर्व तपशील भरा.
३. आता रिफंडच्या स्थितीवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर रिफंडचा स्टेटस येईल.
मूडीजनं दिला इशारा
इंडिगोच्या या संकटावर रेटिंग एजन्सी मूडीजनं (Moody's) मोठ्या समस्येचा इशारा दिला आहे. मूडीजच्या अहवालात म्हटलंय की, एअरलाइन कंपनीमध्ये निर्माण झालेली परिस्थिती (म्हणजे फ्लाईट रद्द होणं, रिफंड आणि प्रवाशांना झालेला त्रास) यामुळे आगामी काळात इंटरग्लोब एव्हिएशनला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कंपनीविरुद्ध डीजीसीए आणि सरकारकडून मोठा दंड आकारला जाऊ शकतो.
सध्याचा काळ प्रवासासाठी उत्तम (पीक) मानला जातो, कारण हिवाळ्यात लोक सहसा फिरायला जातात. याव्यतिरिक्त, लग्नाच्या सीझनलाही सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत, एअरलाइन कंपनी इंडिगोमुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाचा परिणाम कंपनीवर दीर्घकाळ दिसून येऊ शकतो.
