Join us

भारताची तिसऱ्या क्रमांकावर झेप !

By admin | Updated: May 1, 2014 18:01 IST

जागतिक अर्थकारणात दबदबा असलेल्या अमेरिका व चीननंतर भारताची अर्थव्यवस्था अधिक सक्षम असल्याचे शिक्कामोर्तब जागतिक बँकेने त्यांच्या ताज्या अहवालात केले आहे.

पंतप्रधानांचे काम बोलले : जागतिक अर्थव्यवस्थेत जपानला मागे टाकले
शीलेश शर्मा ■ नवी दिल्ली
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना निष्क्रीय सिद्ध करण्यासाठी भाजपाने सारी शक्ती पणाला लावली असताना जागतिक अर्थकारणात दबदबा असलेल्या अमेरिका व चीननंतर भारताची अर्थव्यवस्था अधिक सक्षम असल्याचे शिक्कामोर्तब जागतिक बँकेने त्यांच्या ताज्या अहवालात केले आहे. त्यामुळे भाजपाचा मुखभंग झाला आहे. 
विशेष म्हणजे जपानला मागे टाकत भारताने तिसरा क्रमांक मिळवल्याचे जागतिक बँकेने स्पष्ट केल्याने काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या आर्थिक धोरणाचा एका अर्थाने गौरव झाल्याचे मानले जात आहे. मनमोहनसिंग सरकारच्या धोरणांमुळे भारताने आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी नोंदवत तिसरे स्थान मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. 
विशेष म्हणजे जागतिक बँकेच्या मंगळवारच्या या खुलाशाची काँग्रेसला खबरबातही नव्हती. त्यामुळे साहजिकच बुधवारी झालेल्या ८९ जागांसाठीच्या निवडणुकीत काँग्रेसला त्याचा राजकीय लाभ उठविता आला नाही. आपल्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारने आर्थिक आघाडीवर भरीव कामगिरी केल्यानंतरही हे काम लोकांपर्यंत पोहोचविण्यात पक्षाला यश आले नसल्याची पंतप्रधानांना खंत आहे. 
लोकसभेतील निवडणुकीच्या प्रचारापासून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पूर्णपणे बाजूला राहिल्याचे चित्र आहे. पंजाबमध्ये ते प्रचार करणार होते. मात्र त्यांनी त्यास इन्कार केल्याची सूत्रांची माहिती आहे. तर व्यस्ततेमुळे पंतप्रधान प्रचारात भाग घेऊ शकले नाहीत, असे स्पष्टीकरण पक्षाचे प्रवक्ते शकील अहमद यांनी दिले आहे. पंतप्रधानांनी एक-दोन ठिकाणी प्रचार संभांना संबोधित केले असले तरी आपण वेगळे पडल्याची भावना त्यांच्यात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. २00९ मध्ये सोनिया गांधी यांच्यानंतर मनमोहन सिंग हे पक्षाचे स्टार प्रचारक होते. 
'भारताला आणखी बराच मोठा पल्ला गाठणे बाकी' 
भारत प्रगतीपथावर आहे आणि आणखी बराच मोठा पल्ला गाठणे बाकी आहे, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग बुधवारी म्हणाले. नियोजन आयोगासमोरच्या निरोप भाषणात ते बोलत होते. पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष आहेत. 
■ जागतिक बँकेच्या समूहाशी संलग्न असलेल्या 'आंतरराष्ट्रीय तुलना कार्यक्रमा'ने (आयपीसी)प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 
■ आयपीसीच्या अहवालानुसार पहिल्या दोन अर्थव्यवस्थेतील सरासरी प्रति व्यक्ती जीडीपी १,00,000 डॉलर आहे.
सहा वर्षांत मोठा विकास; दहाव्या स्थानावरून तिसर्‍या स्थानी
■ २00५ साली जागतिक अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत १0 व्या स्थानी असलेल्या भारताने २0११ साली तिसर्‍या स्थानावर गरुड भरारी घेतली आहे. सर्वांत मोठय़ा अर्थव्यवस्थेचा मान असलेली अमेरिका पहिल्या स्थानी कायम असून, चीन दुसर्‍या स्थानी आहे. २00५ साली तिसर्‍या स्थानावर असलेल्या जपानला भारतीय अर्थव्यवस्थेने मागे टाकले आहे.