ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - आर्थिक पेचप्रसंगात अडकलेल्या भारताची स्पर्धात्मकतेमध्ये जागतिक स्तरावर घसरण झाली आहे. स्पर्धात्मकतेमध्ये भारत ७१ व्या स्थानावर पोहोचला असून ब्रिक्स देशांमध्ये भारताचा सर्वात तळाचा क्रमांक लागला आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे नुकताच जागतिक स्तरावर देशांमधील स्पर्धात्मकतेसंदर्भातील 'ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस लिस्ट' हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. १०० दिवस पूर्ण करणा-या मोदी सरकारने आगामी काळात अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्याचे आश्वासन दिले असतानाच हा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकतेमध्ये स्वित्झर्लंडचा पहिला क्रमाकं लागतो. सिंगापूर दुस-या आणि अमेरिका तिस-या स्थानावर आहे. तर फिनलँड (४), जर्मनी (५), जपान (६), हाँगकाँग (७) नेदरलँड (८), युनायटेड किंगडम (९) आणि स्वीडन (१०) या देशांचा अव्वल दहा देशांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
२००९ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ८.५ असतानाही स्पर्धात्मकतेमध्ये भारताची पिछेहाट सुरु झाल्याचे निरीक्षण अहवालात मांडले आहे. बाजार सुलभीकरण, बाजाराचा आर्थिक विकास अशा विविध पातळीवर भारताची घसरण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. भारताने स्पर्धाकत्मकता वाढवल्यास देशाच्या आर्थिक विकासात सुधारणा होऊन रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होऊ शकेल असे मतही फोरमने मांडले आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे तयार होणारा अहवाल हा १२ निकषांच्या आधारे तयार केला गेला असून यामध्ये १४४ देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. संस्था, इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण, उच्चशिक्षण आणि प्रशिक्षण, कामगार वर्गाची क्षमता, आर्थिक विकास, तंत्रज्ञानाची वापर करण्याची तयारी, मार्केट साईझ, बाजाराचे सुलभीकरण आणि नवीन शोध लावणे अशा निकषांच्या आधारे हा अहवाल तयार केला जातो.