Join us  

भारतीय कंपन्यांना नफा!

By admin | Published: June 01, 2016 3:44 AM

२००७पासून जागतिक मंदीने त्रस्त झालेल्या भारतीय कंपन्यांना गेल्या आर्थिक वर्षापासून नफ्याची झुळूक मिळाली आहे. नफ्याच्या या गारव्याने भारतीय कंपन्यांमध्ये समाधानाचे वातावरण

मुंबई : २००७पासून जागतिक मंदीने त्रस्त झालेल्या भारतीय कंपन्यांना गेल्या आर्थिक वर्षापासून नफ्याची झुळूक मिळाली आहे. नफ्याच्या या गारव्याने भारतीय कंपन्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी काळात आर्थिक सुधारणा झाल्यास पुन्हा एकदा नफ्याची टक्केवारी २५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास आता उद्योगवर्तुळातून व्यक्त होत आहे.मंदीचे कवित्व महाकाय अर्थव्यवस्थांत सुरू असले तरी भारत त्यातून बाहेर पडला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कंपन्यांच्या व्यवसायाने धिम्या गतीने का होईना पण वेग पकडण्यास सुरुवात केली आहे. याचे प्रतिबिंब त्यांच्या बॅलेन्सशीटमधून उमटत आहे. ३१ मार्च २०१६ रोजी संपलेल्या २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे चित्र तपासले तर भारतात ‘कंपनी’ अशी नोंदणी असलेल्या ४० हजार कंपन्यांपैकी किमान सात हजारांपेक्षा जास्त लहान-मोठ्या भारतीय कंपन्यांनी सरासरी १० ते १५ टक्क्यांच्या दरम्यान नफा नोंदविला आहे. तर, किमान पाच हजार कंपन्यांच्या नफ्याची टक्केवारी ही सरासरी १५ ते १८ टक्क्यांच्या घरात आहे. महाकाय असा लौकिक असणाऱ्या सुमारे दोन हजार कंपन्यांनी २० टक्क्यांच्या निव्वळ नफ्याची टक्केवारी ओलांडली आहे. विकसित देशांच्या तुलनेत आणि त्यातही आशिया खंडातील अन्य महत्त्वाच्या देशांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांची ही कामगिरी उत्तम असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अर्थतज्ज्ञ डॉ. अथर्व केळकर म्हणाले की, भारतीय कंपन्यांच्या या कामगिरीकडे दोन प्रकाराने पाहावे लागेल. पहिला मुद्दा म्हणजे, आजही जागतिक पातळीवर विशेषत: विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांत तितका सुधार नाही. त्या पार्श्वभूमीवर किरकोळ प्रमाणात का होईना पण भारतीय कंपन्यांच्या निर्यातीमध्ये सुधार दिसत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, तेल व सोन्याच्या आयात खर्चात झालेल्या बचतीमुळे महागाई काही प्रमाणात कमी झाली आणि लोकांच्या हाती पैसे शिल्लक राहण्यास सुरुवात झाल्याने अन्य खरेदीचे प्रमाण वाढले; आणि याचा परिणाम देशांतर्गत पातळीवर भारतीय कंपन्यांच्या मालाला उठाव मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिरतेच्या जाळ्यातून बाहेर येत भारतीय कंपन्यांनी उमटविलेला ठसा हा निश्चितच उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)अहवालाद्वारे 2007पासूनच्या भारतीय कंपन्यांच्या नफ्याची टक्केवारी उजेडात आली आहे. ३१ मार्च २००७ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात अर्थात २००६-०७ या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांनी सरासरी 20% नफा नोंदविला होता. 2011 नंतर काही प्रमाणात मंदीचा जोर ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू पुन्हा एकदा भारतीय कंपन्यांना अत्यल्प प्रमाणात नफ्याची चुणूक जाणवण्यास सुरुवात झाली. परंतु, गेल्या आर्थिक वर्षात नफ्याचे प्रमाण अधिक ठाशीवपणे समोर आले आहे.