Join us  

भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत दिल्या १.१३ लाख नोक-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:13 AM

भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत १,१३,000 पेक्षाही जास्त रोजगारनिर्मिती केली, तसेच सुमारे १८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. भारतीय उद्योग क्षेत्रातील संघटना ‘सीआयआय’ने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

वॉशिंग्टन : भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत १,१३,000 पेक्षाही जास्त रोजगारनिर्मिती केली, तसेच सुमारे १८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. भारतीय उद्योग क्षेत्रातील संघटना ‘सीआयआय’ने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.‘इंडियन रुटस्, अमेरिकन सॉइल’ या नावाच्या अहवालात १00 प्रमुख भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत निर्माण केलेल्या रोजगाराची प्रांतनिहाय माहिती देण्यात आली आहे. रोजगारनिर्मितीप्रमाणेच इतर कामगिरीचा तपशीलही अहवालात देण्यात आला आहे.अहवालात म्हटले आहे की, भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत औद्योगिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर)अंतर्गत १४७ दशलक्ष डॉलरचे योगदान दिले आहे. याशिवाय संशोधन आणि विकास क्षेत्रात ५८८ दशलक्ष डॉलरचा खर्च केला आहे. १00 प्रमुख भारतीय कंपन्यांनी अमेरिकेतील ५0 राज्यांत, तसेच डिस्ट्रिक्ट आॅफ कोलंबिया आणि प्युअर्टो रिकोमध्ये १,१३,४२३ लोकांना रोजगार दिला. या कंपन्यांनी विविध पातळ्यांवर केलेली गुंतवणूक १७.९ अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.भारतीय कंपन्यांनी रोजगार निर्माण केलेल्या सर्वोच्च पाच राज्यांत न्यू जर्सी (८,५७२ रोजगार), टेक्सास (७,२७१ रोजगार), कॅलिफोर्निया (६,७४९ रोजगार), न्यू यॉर्क (५,१३५ रोजगार), जॉर्जिया (४,५५४ रोजगार) यांचा समावेश आहे.भारतीय कंपन्यांनी गुंतवणूक केलेल्या सर्वोच्च पाच राज्यांत न्यू यॉर्क (१.५७ अब्ज डॉलर), न्यू जर्सी (१.५६ अब्ज डॉलर), मॅसॅच्युसेटस् (९३१ दशलक्ष डॉलर), कॅलिफोर्निया (५४२ दशलक्ष डॉलर), वायमिंग (४३५ दशलक्ष डॉलर) यांचा समावेश आहे.अहवालातील माहितीनुसार, भारतीय कंपन्यांकडून अमेरिकेत प्रति प्रांत सरासरी १८७ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक प्राप्त झाली. ८५ टक्के कंपन्यांनी आणखी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.८७ टक्के कंपन्यांनी आगामी पाच वर्षांत स्थानिक लोकांना आणखी रोजगार देण्याच्या योजना तयार केल्या आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :अमेरिकानोकरी