न्यू यॉर्क : वैविध्यकरणासह सुधारणांवर भर देत आर्थिक आघाडीवर स्थिती भरभक्कम करण्याच्या दिशेने केल्या जात असलेल्या प्रयत्नांमुळे आगामी दशकात भारतच जागतिक आर्थिक वृद्धीचे केंद्र होईल. या आर्थिक वाटचालीत चीनला भारत पिछाडीवर टाकेल, असा निष्कर्ष अमेरिकेतील नावाजलेल्या हार्वर्ड विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विकास केंद्राने (सीआयडी) आर्थिक वृद्धीबाबत केलेल्या अभ्यासपूर्ण संशोधनाअंती काढला आहे.या संशोधनानुसार २०२५पर्यंत भारत आणि युगांडा ७.७ टक्के वार्षिक आर्थिक वृद्धी दराने जगातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होणारी अर्थव्यवस्था असेल. एकीकडे भारतीय आर्थिक वृद्धीच्या वाटेने आगेकूच करीत असताना येणाऱ्या दशकात मात्र जागतिक आर्थिक वाटचाल सुस्तावलेली असेल, असा इशाराही हार्वर्ड विद्यापीठातील या केंद्राच्या संशोधकांनी आर्थिक वृद्धीसंदर्भात अंदाज व्यक्त करताना दिला आहे.गेल्या काही वर्षांपासून जागतिक आर्थिक घडामोडीचे मुख्य केंद्र चीनऐवजी भारत बनले आहे. आगामी दशकापर्यंत भारतच जागतिक आर्थिक वृद्धीचे मुख्य केंद्र असेल. तथापि, उदयोन्मुख अर्थव्यवस्थेची गती वेगवेगळी असू शकते. इंडोनेशिया आणि व्हिएतनामच्या नेतृत्वाखाली आग्नेय आशिया आणि पूर्व आफ्रिकेत वृद्धीचे नवे केंद्र निर्माण होईल, अशी आशाही यात व्यक्त करण्यात आली आहे. भारताने आर्थिक सुधारणांची प्रक्रिया राबवत नवनवीन क्षेत्राच्या विकासासाठी वैविध्यपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामुळे भारताची वित्तीय स्थिती सक्षम होत भरभक्कम झाल्याने भारत आर्थिक वृद्धीच्या दिशेने दमदारपणे आगेकूच करीत आहे, असेही स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. भारताने निर्यात क्षेत्रातील वैविध्यावर भर दिला. निर्यात व्यापारात रासायनिक, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यासारख्या किचकट क्षेत्राला उभारी दिली. आर्थिक वृद्धीसंदर्भातील ताजी आकडेवारी चीनच्या निर्यात व्यापारात लक्षणीय घट झाल्याचे दर्शविते. जागतिक आर्थिक मंदीनंतर पहिल्यांदाच चीनचे आर्थिक पतमानांकन चार पायऱ्यांनी खाली घसरले आहे. तथापि, आर्थिक वृद्धी दराच्या बाबतीत चीनचा दर आजही जागतिक सरासरीपेक्षा अधिक असला तरी आगामी दशकांत चीनचा आर्थिक वृद्धी दर ४.४ टक्के असेल असा अंदाज आहे. आजघडीच्या तुलनेत ही घट लक्षणीयच आहे. (वृत्तसंस्था)तेल उत्पादकांची अडचणएकमेव संसाधनांवर विसंबून असलेल्या सर्व प्रमुख तेल उत्पादक देशांना अनपेक्षित अडचणीचा सामना करावा लागत आहेत. भारत, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांनी मात्र वैविध्यकरणासह नव्याने क्षमता केली असल्याने आगामी काळात या देशांचा आर्थिक वाटेवरील वेग अधिक असेल, असे या केंद्राचे संचालक व हार्वर्ड केनेडी स्कूलचे प्रो. रिचर्ड हौसमन यांनी म्हटले आहे.
आगामी दशकात भारतच आर्थिक वृद्धीचे मुख्य केंद्र
By admin | Updated: July 8, 2017 00:27 IST