Join us  

निर्देशांकाची नजर ३० हजारांकडे

By admin | Published: January 26, 2015 3:51 AM

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या चांगल्या वाढीचे भाकीत केल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्याने शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवीन उंची गाठली आहे

प्रसाद गो. जोशी - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या चांगल्या वाढीचे भाकीत केल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्याने शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी नवीन उंची गाठली आहे. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २९ हजारांचा टप्पा ओलांडून गेल्यानंतर बाजाराला आता ३0 हजार अंशांचे वेध लागलेले दिसत आहेत.गतसप्ताहात मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २९२७८.३४ अंशांची नवीन उंची गाठली. या सप्ताहात निर्देशांकात ११५६.४५ अंश म्हणजेच ४.११ टक्क्यांनी वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) प्रथमच ८८३५.६0 अंशांवर बंद झाला. सप्ताहभरात या निर्देशांकात ३२१.८0 अंश म्हणजे ३.७८ टक्क्यांनी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या जगभरात अर्थव्यवस्थांच्या वाढीच्या अंदाजात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर चालू आर्थिक वर्षात मागील अंदाजापेक्षा काहीसा कमी केला असला तरी सन २0१६-१७ यावर्षात भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षा अधिक वेगाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ५.६ टक्के तर सन २0१५-१६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ६.३ टक्के दराने वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. या अंदाजानंतर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. परकीय वित्त संस्थांबरोबरच गुंतवणुकदार आणि देशी वित्त संस्थानीही मोठ्याप्रमाणावर खरेदी केल्याने निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली. मागील वर्षीच्या जून महिन्यानंतर झालेली ही सर्वाधिक सप्ताहिक वाढ होय. गेल्या काही महिन्यांपासून परकीय वित्त संस्थांनी सुरु केलेली खरेदी मागील सप्ताहातही सुरु राहिली.