Join us  

आरोग्य विम्याचा टक्का वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2016 3:52 AM

वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च आणि विम्यासंदर्भात लोकांमध्ये वाढती जागरूकता याचा सकारात्मक परिणाम आरोग्य विम्याचा टक्का वाढण्याच्या रूपाने दिसून येत आहे.

- मनोज गडनीस,  मुंबई

वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च आणि विम्यासंदर्भात लोकांमध्ये वाढती जागरूकता याचा सकारात्मक परिणाम आरोग्य विम्याचा टक्का वाढण्याच्या रूपाने दिसून येत आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत विमा कंपन्यांनी २५ टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदविली आहे.आरोग्य विम्याच्या वाढत्या टक्क्याचे विश्लेषण करताना विमा उद्यागाचे विश्लेषक अजित पुरोहित म्हणाले की, मुळात विमा प्रकाराबद्दलच भारतीयांचा दृष्टिकोन काहिसा वेगळा आहे. एखाद्या योजनेत पैसे भरले तर त्यातून कधी आणि किती परतावा मिळतो या बचत आणि गुंतवणुकीच्या अनुषंगाने ते विमा प्रकाराकडेही पाहतात. त्यामुळेच, ज्या योजनेचा प्रिमियम कमी आहे; पण काही अपघात अथवा अन्य काही झाल्याशिवाय पैसेच मिळणार नाहीत, अशा उत्पादनांच्या खरेदीबाबत भारतीय ग्राहक काहीसे नाखूश असतात. अर्थात हे चित्र अगदी अलीकडेपर्यंत होते. मात्र यामध्ये आता झपाट्याने बदल होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे, भारतीय लोकांमध्ये आता जीवनशैली, निरोगी आयुष्य, आहार, फिटनेस आदींबाबतीत जागरूकता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच, वाढता तणाव अथवा एकूण आजाराच्या प्रमाणातही दुसरीकडे वाढ होताना दिसत आहे. हे आजार आणि त्यावरील खर्च यांचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे उपचारांवरील वाढता खर्च लक्षात घेत अनेक लोकांनी आपल्या उत्पन्नातून पैशांची वेगळी बचत बाजूला काढून ठेवण्याऐवजी किंवा ठेवण्यासोबत आरोग्य विम्याला पसंती दिल्याचे दिसते. तसेच, विम्याच्या अन्य प्रकाराच्या तुलनेत आरोग्य विम्याचे दावे स्वीकारून त्यानुसार ग्राहकाला लाभ मिळण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळेही ग्राहकांचा यावर विश्वास बसू लागला आहे. याचसोबत नोकरदारांसाठी कळीचा मुद्दा म्हणजे, आरोग्य विम्याच्या खरेदीला प्राप्तिकरातील बचतीचे कवच असल्यामुळे आणि या योजनांत आलेल्या सुलभतेमुळे आरोग्य विम्याचा टक्का वाढताना दिसत आहे. (प्रतिनिधी)आरोग्य विमा लोकप्रिय का?- आरोग्य विमा योजना प्रकार जेव्हा भारतात सादर झाला त्या वेळी त्याच्या रचनेमुळे अनेक लोकांना ती आकर्षक वाटत नव्हती. मात्र कालौघात या कंपन्यांनी आपली अनेक वेगवेगळी उत्पादने तयार केली. विशेष म्हणजे, भारतीयांची जीवनशैली लक्षात घेऊन तसेच भारतात असलेल्या विविध आजारांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार त्या आजारांचा अंतर्भाव आपल्या योजनांतून केला. याचसोबत, कुटुंबाचा आरोग्य विमा यांसारख्या लोकांना रुचतील अशा योजनाही सादर केल्या. तसेच, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जर विमाधारकाला कधीही रुग्णालयात दाखल करायची वेळ आली तर, त्या वेळी पैशांच्या गरजेचा मुद्दा लक्षात घेता आरोग्य विमा कंपन्यांनी ‘कॅशलेस’ अर्थात, त्या वेळी पैसे न भरता, आरोग्य विमा कंपनीने विमाधारकास जे कार्ड दिले आहे. केवळ त्या कार्डाच्या आधारे सर्व खर्च केले जातील, अशी काही योजना सादर केल्यामुळे या योजना आता भारतीय ग्राहकांत लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. 25% वैयक्तिक आणि कुटुंबाच्या पातळीवर आरोग्य विम्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या टक्केवारीत २५ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. 19% कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खरेदी केलेल्या आरोग्य विम्याच्या टक्केवारीत १९ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. 12% आरोग्य विम्याची सेवा देणाऱ्या सरकारी व खाजगी अशा दोन्ही विमा कंपन्यांच्या नफ्यात सरासरी १२ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. (विमा काउन्सिलकडील माहिती)देशामध्ये विमा या घटकासंदर्भात पुरेशी जागरूकता नसल्यामुळे अनेक लोक त्याचा अवलंब करत नाहीत. त्यातही विमा प्रकारातील आरोग्य विम्याच्या प्रकाराकडे आजवर लोकांचे सातत्याने दुर्लक्षच होत होते. आकडेवारीत सांगायचे झाल्यास 121कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आरोग्य विम्याचे कवच असलेल्या लोकांची संख्या अवघी २ टक्के इतकी होती. परंतु, वैद्यकीय खर्चात होणारी वाढ आणि विमा कंपन्यांनी भारतीय लोकांची जीवनशैली व त्या अनुषंगाने तयार केलेल्या नव्या योजना यामुळे आरोग्य विमा योजनेचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास देशातील आरोग्य विमाधारकांच्या टक्केवारीत दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे.