मुंबई : स्मार्ट फोन आणि ३-जीच्या माध्यमातून मिळणाऱ्या ब्रॉडबँड सेवेत वाढ होत असल्यामुळे मोबाईल कॉमर्स उद्योगाने वेग पकडला असून, याचा सर्वाधिक लाभ हा मोबाईल बँकिग झाल्याचे दिसून आले आहे. मोबाईल बँकिंगमध्ये सरकारी व खाजगी बँकांनी केलेल्या कामगिरीचा आढावा एका सर्वेक्षण संस्थेने प्रसिद्ध केला असून, यातून मोबाईल बँकिंगने कसा जोर पकडला आहे, याची रंजक माहिती पुढे आली आहे. खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य अशा आयसीआयसीआय बँकेने यात बाजी मारली असून महिनाभराच्या कालावधीत एक हजार कोटी रुपयांची उलाढाल मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून केली आहे.२०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये बँकेने एकूण ५७४१ कोटी रुपयांची उलाढाल मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून केली होती. मात्र, यातुलनेत चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यांतच या उलाढालीने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत निम्म्या उलाढालीचा आकडा पार केला आहे.याबाबतीत एचडीएफसी बँकही मागे नसून, बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेच्या माध्यमातून व्यवहारात तिप्पट वाढ नोंदली गेली आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात जून महिन्यात २६६ कोटी रुपयांच्या केलेल्या उलाढालीच्या तुलनेत यंदा ७९५ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर अॅक्सिस बँकेच्या व्यवहारांत तब्बल पाच पट वाढ झाली आहे. जून २०१३ च्या तुलनेत जून २०१४ मध्ये बँकेचे तब्बल ५८६ कोटी रुपयांचे व्यवहार मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून झाले आहेत.मूळात मोबाईल आणि एकूणच इंटरनेटवरून होणाऱ्या व्यवहारांत सुरक्षा कवच निर्माण करण्या बँकांना आलेले यश आणि याचबरोबर मोबाईल इंटरनेटचा आश्वासक वेग याचा मोठा फायदा मोबाईल बँकिंगच्या घटकाला झाला आहे. या डिजिटल व्यवहारांमुळे बँकांचाही उलाढालीवरील खर्च कमी होत असल्याने या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना बँका प्रोत्साहित करण्यासाठी विविध प्रकारच्या सूट योजना जाहीर करत आहेत. आॅनलाईन बिल भरणा केल्यास २ ते ३ टक्के सूट देणे वगैरे सूट देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचाही ओढा वाढत असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मोबाईल बँकिंग व्यवहार तेजीत
By admin | Updated: August 14, 2014 03:53 IST