भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या पतधोरणामध्ये अपेक्षेनुसार झालेली व्याजदर कपात, भारत-पाक सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न, अनुकूल असलेले आंतरराष्ट्रीय वातावरण आणि कमी किमतींमध्ये खरेदीसाठी गुंतवणूकदारांची पसंती अशा वातावरणामुळे सप्ताहामध्ये शेअर बाजाराच्या निर्देशांकांमध्ये वाढ झाली. निर्देशांकांनी महिनाभरामधील उच्चांकी वाढ दर्शविली आहे.मुंबई शेअर बाजारामध्ये गतसप्ताहात संमिश्र वातावरण राहिले. पहिले दोन दिवस निर्देशांक वाढला. मात्र, त्यानंतरच्या तीन दिवसांमध्ये तो खाली येत गेला. मात्र, वाढीपेक्षा घसरण कमी असल्याने, सप्ताहाच्या अखेरीसही तो हिरव्या रंगात राहिला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस २८,०६१.१४ अंशांवर बंद झाला. गतसप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये तो १९५.१८ अंश म्हणजेच ०.७० टक्क््यांनी वाढून बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ही ८६.४५ अंशाने वाढून ८६९७.६० अंशांवर बंद झाला.भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या नवीन गव्हर्नरांचे पहिले पतधोरण अपेक्षेनुसार आले. पतधोरणाची निश्चिती आता समितीमार्फत होत असल्याने व्याजदरात कपात अपेक्षित होती. पाव टक्क््याने कमी झालेल्या व्याजदरांनीही बाजाराला उभारी दिली. या धोरणानंतर बाजारात जोरदार खरेदी झाल्यामुळे बाजार वाढलेला दिसून आला. गेल्या सप्ताहामध्ये बाजार खाली आल्यामुळे अनेक चांगले समभाग आकर्षक किमतींमध्ये उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या खरेदीला गुंतवणूकदारांनी पसंती दिली. या जोडीलाच आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्येही तेजीचे वारे वाहत असल्यामुळे, त्याचा फायदाही भारतीय शेअर बाजाराला मिळाला.भारत-पाक दरम्यानचा तणाव कमी करण्यासाठीचे प्रयत्न जोरदार होत असल्यामुळे, त्याचाही बाजारावर चांगला परिणाम झालेला दिसून आला. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी जाहीर झाली आहे. मात्र, तत्पूर्वीच भारतीय बाजार बंद झालेला असल्याने बाजाराची त्यावरील प्रतिक्रिया सोमवारी कळेल. सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या शेती क्षेत्राशिवायच्या अन्य रोजगारांमध्ये वाढ झालेली दिसून येते. मात्र, एकूण बेरोजगारीमध्येही ०.१ टक्क््याने वाढ होऊन हे प्रमाण आता पाच टक्क््यांवर पोहोचले आहे. याचाच अर्थ जगातील अव्वल अर्थव्यवस्थेची गाडी अद्याप पूर्णपणे रुळावर आलेली नाही.आगामी सप्ताहामध्ये विविध आस्थापनांच्या तिमाही निकालांची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे, औद्योगिक उत्पादन निर्देशांकही जाहीर होणार आहे. या सर्व बाबी बाजाराची पुढील दिशा ठरविणार आहेत.
अनुकूल वातावरणाने निर्देशांकांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 04:46 IST