नवी दिल्ली : इराकमध्ये भडकलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर वस्तू बाजारात भाववाढ झाल्यामुळे सरकारने सोने-चांदीच्या आयात शुल्कात वाढ केली आहे. ही वाढ अनुक्रमे ४११ डॉलर प्रति १० ग्रॅम आणि ६३२ डॉलर प्रतिकिलो अशी आहे.चालू महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सोन्यावरील आयात शुल्क ४०८ डॉलर प्रति दहा ग्रॅम आणि चांदीवर ६१७ डॉलर प्रतिकिलो एवढे होते. व्यावसायिकांकडून व्यापारी मूल्य कमी दाखवून शुल्क चोरी होऊ नये म्हणून जे किमान मूल्य आकारले जाते त्या सीमा शुल्कास आयात शुल्क असे म्हणतात. सरकारकडून दर पंधरवड्यात याचा आढावा घेतला जातो.एका अधिकृत निवेदनानुसार, सोने-चांदी यावरील आयात शुल्कात वाढ करण्याची अधिसूचना केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क बोर्डाद्वारे जारी करण्यात आली आहे.इराकमध्ये गेल्या काही दिवसांत हिंसाचारात वाढ झाली आहे. यामुळे जागतिक बाजारात या मौल्यवान धातूंचे भाव गेल्या दोन आठवड्यांत वाढले आहेत. सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव १,२८३.९० डॉलर प्रतिऔंस राहिला, तर चांदीचा भाव १९.७९ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने-चांदीवरील आयात शुल्कात वाढ
By admin | Updated: June 16, 2014 23:34 IST