Join us

ेसुधारित-पाऊस एकत्रित - विदर्भात तीन ठार

By admin | Updated: August 30, 2014 00:04 IST



विदर्भात पावसाचे तीन बळी

मुंबई : राज्यात पावसाचा जोर कायम असून, शुक्रवारी विदर्भात वीज पडून तीन बळी गेले़ तर संगमनेरमध्ये पुराच्या पाण्यामुळे १७ जनावरे दगावली असून, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही पावसाने हजेरी लावली.
यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. वर्धा जिल्ह्यात दोन गायी ठार झाल्या.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वरोडी (जुनी) येथे छाया अनंत अडकिने (४०) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे येन्सा गावालगत अरसिन अनिस कुरेशी (२७) आणि अजहर मो. बेग हे दोघे (रा. हिंगणघाट) मोटारसायकलने घरी परतत होते. पावसामुळे झाडाखाली थांबलेल्या अरसिन अनिस कुरेशीचा वीज मृत्यू झाला तर अजहर गंभीर जखमी झाला. वर्धा जिल्ह्यात अंबिकापूर पुर्नवसन येथे वीज पडून किरण शंकर खोंडे (४२) यांचा मृत्यू झाला.
दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस
कोल्हापूर शहरासह सांगली-मिरज व सातारा जिल्ह्यांत शुक्रवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. गेले दोन-तीन दिवस या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. इचलकरंजी शहर व परिसराला तर मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
सांगली, मिरजेत सलग पाचव्या दिवशी पावसाची संततधार सुरूच राहिली.
संगमनेरमध्ये १७ जनावरे दगावली
अतिवृष्टीमुळे शहरातील भारतनगरमधील व्यापार्‍यांची १७ जनावरे मृत्युमुखी पडली. सोमवारी शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. शहराच्या अनेक भागांमध्ये घरे व दुकानांत पाणी घुसून संसारपयोगी व जीवनावश्यक वस्तूंसह दुकानांमधील मालाचे प्रचंड नुकसान झाले. भारतनगरमध्ये जनावरांचा व्यापार होतो. तेथे खलील कुरेशी यांच्या गोठ्यात ८-१० फूट उंचीपर्यंत पाणी घुसून १७ बैल दगावले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
--------------------------------------
बॉक्स
गुलबर्ग्यात तीन ठार; साठ घरे कोसळली
कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे हाहाकार माजला आहे. पावसामुळे साठ घरांची पडझड झाली. दुर्घटनेत तीन जण दगावले़ शेकडो घरांत पाणी शिरल्यामुळे लोकांना रात्र जागून काढावी लागली़ अनेकांच्या चुली पेटल्या नाहीत. पूरग्रस्तांनी शाळा आणि मंदिरात आश्रय घेतला आहे. गुलबर्गा शहरात गुरूवारी शाळा सुटल्यानंतर घरी परतताना शालेय विद्यार्थी महादेव (६) उघड्या गटारीतून वाहून गेला. त्याचा मृतदेह शुक्रवारी शहरातील कमलनगर परिसरात सापडला. आळंद तालुक्यातील हित्तल शिरूर येथे विद्युततार अंगावर पडल्याने बाबू (४५) व पार्वती(४०) हे पती-पत्नी मरण पावल्याचे पोलिसांनी सांगितले.