नवी दिल्ली : औषधी निरीक्षकांच्या कमतरतेमुळे भारतीय औषधी उद्योगांना अमेरिकेसह अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, निर्यातीवर परिणाम होत आहे, असे असोचेमने आपल्या अहवालात म्हटले आहे. देशात औषध उत्पादनांच्या १०,००० कंपन्यांसाठी फक्त १५०० निरीक्षक आहेत. असोचेम आणि आरएनसीओएस या संशोधन करणाऱ्या कंपनीने केलेल्या अध्ययनात ही बाब समोर आली आहे. कुशल औषधी निरीक्षक नसल्याने निर्यातीवर त्याचा परिणाम होत आहे. भारतीय औषधी उद्योगाने जागतिक बाजारपेठेत वेगाने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे; मात्र या उद्योगासमोर आता नवे संकट उभे ठाकत आहे. अमेरिका आणि युरोपीय बाजारपेठेसमोर ही समस्या अधिक आहे. असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले की, आम्हाला राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर वैश्विक नियमांनुसार इथली व्यवस्था बदलावी लागेल. नियमांत तफावतआंतरराष्ट्रीय नियम आणि देशातील नियमात तफावत आहे त्यामुळे भारतातील औषधी अनेकदा परत मागवावी लागली आहेत किंवा या औषधांना नाकारण्यात आले आहे, ही बाब या अध्ययनातून समोर आली आहे. भारतातील मोठ्या औषधी कंपन्यांच्या बाबतीत हे घडलेआहे. जगातील औषधी उत्पादनात ३१ अब्ज डॉलरच्या उत्पादनासह २०१४ मध्ये भारताचा चौथा क्रमांक आहे. जागतिक औषधी उद्योगात भारताचा वाटा मूल्यानुसार १.४ टक्के, तर उत्पादनानुसार १० टक्के आहे.
निरीक्षकांच्या कमतरतेचा औषध निर्यातीवर परिणाम
By admin | Updated: December 9, 2015 23:33 IST