Join us  

फटाकाबंदीमुळे प्रचंड नुकसान, व्यापा-यांकडे मोठा साठा पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:29 AM

नवी दिल्ली : फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातल्यामुळे नवी दिल्लीतील घाऊक फटाका विक्रेत्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे.काल सर्वोच्च न्यायालयाने नवी दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर ३१ आॅक्टोबरपर्यंत बंदी घातली. बंदीमुळे फटाक्यांच्या मुख्य घाऊक बाजारपेठा असलेल्या जुन्या दिल्लीतील सदर बाजार आणि जामा मशीद परिसरात निराशा पसरली. २० रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंत किंमत असलेल्या फटाक्यांनी येथील दुकाने खचाखच भरलेली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या फटाक्यांचे काय होणार, याची चिंता व्यापाºयांना लागली आहे.सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, गेल्या नोव्हेंबरमध्ये दिल्ली राजधानी परिसरात (दिल्ली-एनसीआर) लागू करण्यात आलेली फटाका विक्री बंदी येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत लागूराहील. १९ आॅक्टोबरला दिवाळी आहे. याचाच अर्थ दिवाळीत दिल्ली-एनसीआर परिसरात फटाका विक्री करता येणार नाही. प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय न्यायालयाने दिला.जामा मशीद परिसरातील फटाक्यांचे एक घाऊक विक्रेते अमित जैन यांनी सांगितले की, आमच्याकडे फटाक्यांचा जुना साठा आहे. त्याचे काय करायचे, हा आता आमच्यासमोरील प्रश्न आहे. कोट्यवधींचा हा साठा वाया जाणार आहे. सदर निष्कर्म वेलफेअर असोसिएशनचे प्रमुख हरजीतसिंग छाबरा यांनी सांगितले की, फटाका विक्री बंदीमुळे होणारे नुकसानहजारो कोटींत असेल. दिल्ली-एनसीआरमध्ये फटाका विक्रीचे ५०० हंगामी परवाने याआधीच वितरित झाले आहेत. त्यातील २४ परवाने सदर बाजारमधील आहेत. कायम परवाने वेगळे आहेत.छाबरा यांनी म्हटले की, आम्ही फटाका विक्री करीत आहोत, अणुबॉम्ब नव्हे. हा भारत आहे, तालिबान नव्हे. तुम्ही अशा प्रकारे बंदी घालू शकत नाही.सदर बाजारमधील एका फटाका विक्रेत्याने सांगितले की, अणुबॉम्बवर बंदी घाला, फटाक्यांवर नव्हे. अन्य एकाने सांगितले की, नियमन करणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे. बंदी घालणे नव्हे. तिसरा दुकानदार म्हणाला की, त्यांनी दिल्लीत दिवाळीवरच बंदी घातली आहे.

टॅग्स :दिवाळीफटाके