Vijay Mallya News: देशातील बँकांना फसवून परदेशात पळून गेलेल्या विजय माल्ल्याने सरकार आणि बँकांवर कर्ज वसुलीत पारदर्शकता नसल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये मल्ल्यानं आतापर्यंत वसूल झालेल्या रकमेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणीही केली आहे. बँका आणि सरकारी मंत्र्यांनी त्यांच्या थकित कर्जाबाबत वेगवेगळे आकडे दिले असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
विजय माल्याचे प्रश्न
विजय माल्ल्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केलीये. "भारत सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका मला आणि जनतेला आणखी किती दिवस फसवत राहतील? अर्थमंत्री संसदेत सांगत आहेत की माझ्याकडून १४,१०० कोटी रुपये वसूल झाले. बँका म्हणत आहेत की १०,००० कोटी रुपये वसूल झाले. ४,००० कोटी रुपयांच्या फरकाचं काय? आता, अर्थ राज्यमंत्री संसदेला सांगत आहेत की माझ्यावर अजूनही १०,००० कोटी रुपये देणे बाकी आहेत, तर बँका दावा करत आहेत की माझ्यावर ७,००० कोटी रुपये देणे बाकी आहेत. वसूल केलेल्या रकमेचा कोणताही लेखा-जोखा किंवा डिपॉझिट स्टेटमेंट नाही. विशेषतः, जेव्हा माझे न्याय कर्ज (Justice Debt) ६,२०३ कोटी रुपये होते, तेव्हा सत्य जाणून घेण्यासाठी एका निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती का केली गेली नाही? माझ्यासाठीही ही खूप दयनीय स्थिती आहे," असं माल्ल्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
आता आणखी एका सरकारी बँकेतील हिस्सा विकणार सरकार; कोणती आहे बँक, किती कमाई होणार?
प्रत्यर्पणाची शक्यता वाढली
नीरव मोदी, विजय माल्या याच्यासारखे अनेक फरार आरोपी ब्रिटनच्या न्यायालयांमध्ये केस लढून त्यांच्या भारत प्रत्यर्पणाला विरोध करत आहेत. पण नुकताच एक असा घटनाक्रम घडला आहे, ज्यामुळे त्यांना परत भारतात पाठवण्याची शक्यता मजबूत झाली आहे.
How long will the GOI and PSU Banks hoodwink me and the public. Finance Minister says to Parliament that Rs 14,100 crores recovered from me. Banks say Rs 10,000 crores recovered. What about the difference of Rs 4,000 crores ? Now, MOS tells Parliament that I still owe Rs 10,000…
— Vijay Mallya (@TheVijayMallya) December 1, 2025
जीविताचा धोका सांगितला होता
विजय माल्या आणि नीरव मोदी याच्यासारखे फरार गुन्हेगार ब्रिटनच्या न्यायालयांमध्ये असा युक्तिवाद करत आहेत की, जर त्यांना भारतात परत पाठवलं गेलं, तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. नीरव मोदी यानं तर, भारताला आपल्याला सोपवल्यास एकतर आपल्याला मारलं जाईल किंवा आत्महत्या करतील, असं म्हटलं होतं. या आरोपींच्या अशाच युक्तिवादांमुळे ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिसची (CPS) एक टीम काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील तिहार तुरुंगात आली होती.
सूत्रांनुसार, ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिसच्या या टीममध्ये चार लोक होते. दोन CPS चे तज्ज्ञ आणि दोन ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश होता. हा दौरा जुलैमध्ये झाला होता. ब्रिटनमधून फरार आरोपींना भारतात पाठवलं गेल्यास तिहारमध्ये त्यांना कोणत्या सुविधा आणि सुरक्षा मिळतील, हे पाहण्यासाठी ही टीम आली होती. यात नीरव मोदी, विजय माल्या आणि अनेक फरार आरोपींचे खटले समाविष्ट आहेत.
