Join us  

गरम कपड्यांचा बाजार ‘तापलेला’च

By admin | Published: January 26, 2015 3:49 AM

आधीच वाढलेला थंडीचा कडाका व त्यातच अधूनमधून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे तापमानात होणारी घट यामुळे यंदा थंडी लांबतच आहे.

विजयकुमार सैतवाल , जळगावआधीच वाढलेला थंडीचा कडाका व त्यातच अधूनमधून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे तापमानात होणारी घट यामुळे यंदा थंडी लांबतच आहे. यासोबतच गरम कपड्यांचा व्यवसायही लांबून अजूनही त्याचा बाजार ‘गरम’ असल्याचे चित्र या वर्षी दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर हा व्यवसाय अजून एक महिना सुरू राहण्याचा अंदाज आहे. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा नोव्हेंबरमध्ये गरम कपड्यांच्या व्यवसायास सुरुवात होऊन तो मकर संक्रांतीपर्यंत चालतो. मात्र, यंदा वेगळेच चित्र बाजारात दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू झालेली थंडी या वर्षी दिवसेंदिवस वाढतच गेली व अजूनही कायम आहे. यातच दर महिन्याला होणाऱ्या पावसामुळे त्यात भर घातली. या पावसामुळे तापमानात आणखी घसरण होऊन उष्ण खान्देश प्रदेशाने किमान तापमानात महाबळेश्वरला मागे टाकले. याचा थेट परिणाम थंडीशी संबंधित विविध व्यवसायांवर झाला व तो सकारात्मक ठरला. न घेणाऱ्यांकडूनही खरेदीथंडी वाढल्यामुळे संक्रांतीच्या आठवडाभरानंतरही गरम कपड्यांची खरेदी सुरू आहे. याबाबत विक्रेत्यांनी सांगितले की, थंडी लांबत असल्याने गरम कपड्यांना अजूनही मागणी कायम आहे. ‘आता थंडी संपत आली, आता कशाला गरम कपडे घ्यायचे’ असा विचार करणारी मंडळीही या वाढत्या थंडीमुळे हे कपडे घेत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. गरम कपड्यांमध्ये स्वेटर, जॅकीटऐवजी यंदा लहान-मोठ्यांसह महिलांकडूनही स्वेटर सेटला सर्वाधिक मागणी आहे. याला कान टोपीही जोडलेलीच असल्याने कानपट्टा, मफरल, टोपी, लेडीज स्कार्प यांना मागणी कमीच राहिली.थंडीच्या महिन्यांमध्ये व्हॅसलीन, बॉडी लोशन, लिप गार्ड, मॉश्चराईज क्रीम व इतर कॉस्मेटिक वस्तूंना मागणी वाढते. जानेवारी महिन्यात त्यामध्ये घट होते. मात्र, यंदा या वस्तूंची मागणी अजूनही कायम असल्याचे विक्रेते अमीन मणियार यांनी सांगितले.