Join us  

शेतक-यांच्या कर्जमाफी योजनांबाबत इशारा

By admin | Published: August 28, 2014 2:56 AM

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारख्या योजना राबविण्याबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी इशारा दिला असून, या योजनांमुळे होणाऱ्या विपरीत परिणामांकडे लक्ष वेधले आहे

मुंबई : शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारख्या योजना राबविण्याबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी इशारा दिला असून, या योजनांमुळे होणाऱ्या विपरीत परिणामांकडे लक्ष वेधले आहे.आंध्र प्रदेश, तेलंगणा यांसारख्या राज्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना प्रस्तावित केली आहे. अशा योजनांबाबत राजन यांनी सावध केले आहे. बँकांच्या आर्थिक स्थितीवर अशा योजनांचा परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्याच्या सचिव परिषदेसमोर बोलताना राजन यांनी राज्य पातळीवरील समन्वय समित्या अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. वरचेवर या समित्यांच्या बैठका घेऊन, राज्यांचा सहभाग वाढवून, आवश्यक ती माहिती एकमेकांना देत राहून या समित्या सक्षम करता येतील असे त्यांचे म्हणणे आहे. अशा समित्यांनी वित्तीय समावेशनावर लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे बचतीचा ओघ अनधिकृत आणि घोटाळ्यांच्या योजनांकडे जाण्यापेक्षा योग्य प्रवाहात येईल, असेही मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांत गेल्या वर्षी फेलिन वादळाचा तडाखा बसला होता. परंतु जे नुकसान झाले ते पाहता कर्जमाफीसारखा मोठा निर्णय घेणे गरजेचे नव्हते असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)