मुंबई : काही ठराविक प्रकारच्या कर्करोगावर अखेरच्या टप्प्यात वापरले जाणारे ‘बायर’ या बलाढ्य बहुराष्ट्रीय औषध कंपनीचे ‘नेक्सॅवार’ हे औषध भारतात पुरेशा प्रमाणात व रास्त किमतीत उपलब्ध व्हावे यासाठी या औषधाच्या उत्पादनाचा परवाना आंध्र प्रदेशातील ‘नॅटको’ या देशी कंपनीला देण्याच्या पेटन्ट नियंत्रकांच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.‘नेक्सॅवार’ हे औषध बायर या अमेरिकन औषध कंपनीने स्वत: संशोधन करून विकसित केले असून त्याचे जगभरातील स्वामित्वहक्क (पेटन्ट)या कंपनीकडे आहेत. भारतात कारखाने असूनही बायर कंपनी या औषधाचे येथे उत्पादन न करता ते आयात करते. हे औषध विकसित करण्यावर आपण ११४ अब्ज डॉलरचा खर्च केल्याचा कंपनीचा दावा आहे.एखादे पेटन्टेड जीवनावश्यक औषध वाजवी किंमतीत व पुरेशा प्रमाणात देशात उपलब्ध होत नसेल व ज्या कंपनीकडे पेटन्ट आहे ती कंपनी त्यासाठी आवश्यक पावले उचलत नसेल, तर त्या कंपनीला त्या औषधाच्या उत्पादनाचा परवाना अन्य एखाद्या कंपनीस सक्तीने द्यायला लावण्याची तरतूद पेटन्ट कायद्यात आहे. ‘नॅटको’ कंपनीने बायर कंपनीकडे परवाना मिळविण्यासाठी खासगी वाटाघाटी केल्या होत्या. मात्र त्या निष्फळ ठरल्यानंतर ‘नॅटको’ने सक्तीचा परवाना मिळविण्यासाठी पेटन्ट नियंत्रकांकडे अर्ज केला होता.या सक्तीच्या तरतुदीनुसार बायर कंपनीने ‘नॅटको’ कंपनीस ‘नेक्सॅवार’च्या उत्पादनाचा परवाना पेटन्ट नियंत्रकांनी मार्च २१०२ मध्ये दिला होता. त्यानंतर बौद्धिक संपदा अपिली प्राधिकरणानेही गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यावर शिक्कामोर्तब केले होते. याविरुद्ध अमेरिकेतील मूळ बायर कंपनीने उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती. मुख्य न्यायाधीश न्या. मोहीत शहा व न्या. एम.एस. शंकळेशा यांच्या खंडपीठाने ती फेटाळली. परिणामी भारतातील रुग्णांना ‘नॅटको’ कंपनीने बनविलेले हे औषध यापुढेही खूप कमी किंमतीत उपलब्ध होत राहणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
स्वस्त कर्करोग औषधाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील
By admin | Updated: July 17, 2014 00:14 IST