नवी दिल्ली : सरकारने सहापैकी चार कंपन्यांना उड्डाण परवाना दिल्याने आगामी महिन्यांमध्ये अनेक नव्या कंपन्यांचे विमान भारतात झेपावण्याची शक्यता आहे. सहा कंपन्यांनी नियमित उड्डाण, खासगी वा चार्टर विमान सेवा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती.नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, एअरएशिया इंडिया, लिगारे एव्हिएशन लिमिटेड, क्विकजेट कार्गो एअरलाईन्स व एलईपीएल प्रोजेक्टस् लिमिटेड या कंपन्यांना एअर आॅपरेटर्स परमिट अर्थात उड्डाण परवाना देण्यात आला आहे. टाटा-सिया एअरलाईन्स आणि एअर पेगासस लिमिटेडचे प्रकरण प्रलंबित आहे. एअरएशिया इंडियाने आपले काम सुरू केले आहे. टाटा- सिया एअरलाईन्सने सप्टेंबरअखेर किंवा आॅक्टोबरच्या सुरुवातीला विमानोड्डाण सुरू करण्याची घोषणा केली आहे. अलीकडेच नागरी विमान महासंचालनालयाने टाटा-सियाच्या अर्जाविरोधात फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाईन्सचा आक्षेप फेटाळून लावला होता. महासंचालनालयाद्वारे उड्डाण परवाना देण्यासाठी टाटा- सियाच्या अर्जाचा आढावा घेतला जात आहे. नव्या कंपन्या आल्यानंतर स्पर्धा वाढून त्याचा लाभ प्रवाशांना मिळेल, असे जाणकारांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पुढील महिन्यात भारताच्या आकाशात ‘हवाऽऽ हवाई...’!
By admin | Updated: July 28, 2014 03:02 IST