Join us  

हॅकरांनी ४ लाख डॉलरचे डिजिटल चलन लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:44 AM

जालतस्करांनी (हॅकर्स) डिजिटल वॉलेट प्रदाता कंपनी ‘ब्लॅक वॉलेट’वर हल्ला करून ४ लाख डॉलरचे ‘स्टेलर’ गुह्यचलन (क्रिप्टोकरन्सी) लंपास केले आहे.

नवी दिल्ली : जालतस्करांनी (हॅकर्स) डिजिटल वॉलेट प्रदाता कंपनी ‘ब्लॅक वॉलेट’वर हल्ला करून ४ लाख डॉलरचे ‘स्टेलर’ गुह्यचलन (क्रिप्टोकरन्सी) लंपास केले आहे. या घटनेने डिजिटल चलनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.पाश्चात्य वृत्त वाहिनी ‘सीएनएन’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. वृत्तात म्हटल्यानुसार, जाल तस्करांच्या अज्ञात समूहाने ब्लॅक वॉलेटचे सर्व्हर हॅक करण्यात यश मिळविले. या सर्व्हरवर साठा करून ठेवलेले आभासी चलन (व्हर्च्युअल करन्सी) त्यांनी लंपास केले आहे. ब्लॅक वॉलेटच्या संस्थापकानेच एक निवेदन जारी करून हॅकिंगची माहिती दिल्याचे सीएनएनने म्हटले आहे.‘ब्लॅक वॉलेट डॉट कॉम’वरील हा हल्ला आभासी चलन चोरण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. ‘आॅर्बिट ८४’ नावाच्या एका वापरकर्त्याने (युजर) ‘रेडिट’वर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जाल तस्करांनी माझ्या होस्टिंग प्रोव्हाइडर खात्यावर नियंत्रण मिळविले. खात्याची डीएनएस सेटिंग त्यांनी बदलली. या हल्ल्याच्या माध्यमातून जाल तस्करांनी ४ लाख डॉलरचे ‘स्टेलर’ गुह्यचलन लांबविल्याचे दिसते.टेक न्यूज वेबसाईट ‘ब्लिपिंग कॉम्प्युटर’ने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक वॉलेटने आपल्या वापरकर्त्यांना फोरमच्या माध्यमातून संभाव्य हल्ल्याचा इशारा आधीच जारी केला होता. तरीही अनेक वापरकर्ते सर्व्हरवर लॉग ईन होत राहिले आणि पैसे गमावत राहिले. जाल तस्करांनी हा पैसा ‘ब्रिटेक्स’मध्ये वळविला आहे. ब्रिटेक्स हे आभासी चलनाचे विनिमय केंद्र (एक्स्चेंज) आहे. आपला माग लागू नये यासाठी हल्लेखोर लांबविलेला पैसा ब्रिटेक्सवरून दुसºया डिजिटल चलनात रूपांतरित करून घेतील, अशी शक्यता आहे.याआधीही डिजिटल चलन हॅक करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. स्लोव्हानियन क्रिप्टोकरन्सी मायनिंग मार्केट ‘नाईस हॅश’चे सर्व्हर अलीकडेच जाल तस्करांनी हॅक केले होते. ६0 दशलक्ष डॉलरचे बिटकॉईन तस्करांनी लंपास केले होते. या हल्ल्यामुळे ‘नाईस हॅश’चे सीईओ मार्को कोबाल यांना डिसेंबरमध्ये पायउतार व्हावे लागले होते. या हल्ल्यात ४,७३६.४२ बिटकॉईन लांबविण्यात जाल तस्करांना यश आले होते. त्याची किंमत ६0 दशलक्ष डॉलर आहे, असे ‘नाईस हॅश’शी संबंधित सूत्रांनी सांगितले.