करनीती भाग १७२ - सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, भारतात होळीचा उत्सव खूप उत्साहाने व आंनदाने साजरा केला जातो. सगळेच या उत्सवाची आतुरतेने वाट बघतांत. या निमित्ताने सध्या आर्थिक जगतात जीएसटीची वाट बघितली जात आहे. जीएसटी आणि होळी यांची खमंग ज्ञानवर्धक चर्चा करूया !कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, खरच होळी हा आनंदाचा क्षण आहे. या मध्ये अनिष्ट प्रवृत्तींना तिलांजली देवून, चांगल्या गोष्टींचा उपयोग करत हसत खेळत हा उत्सव साजरा केला जातो. जीएसटी या प्रस्तावीत कायाद्याची सुध्दा अशीच समानता आहे. कारण जुने किचवट कायदे जाऊन, नवीन सुटसुटीत कायदा येणार आहे. जीएसटीत ही विविधरंग मिसळून कायदा तयार होत आहे.अर्जंुन : जीएसटीचा रंग कसा?कृष्ण : अर्जुना, जीएसटीच्या कायद्यात सध्याच्या व्हॅट, सेवाकर, एक्साईज डयुटी, कस्टम डयुटी इत्यादी अप्रत्यक्षकर कायद्यांचा रंग मिसळला गेला आहे. आजघडीला वेगवेगळे रंग या कायद्यांना आहेत. अर्थातच या कायद्यांची अंमबजावणी, आकारणी, वसुली व कररचना वेगवेगळी आहे. परंतु जीएसटीच्या कायदा हा ‘एक देश एक कर’ असा आहे. परंतु, यात विविध प्रकारचे कर असल्याने जीएसटीची होळी ‘चौरंगी’ आहे.अर्जुन : कृष्णा, व्हॅट आणि जीएसटीच्या रंगात काय फरक आहे?कृष्ण : अर्जुना, व्हॅटचा रंग जीएसटीत प्रामुख्याने दिसेल. जसे होळीत गुलाबी रंग जास्त दिसतो. तसेच व्हॅट कायद्यातील अनेक तरतूदी जीएसटीत समाविष्ट केल्या आहेत. व्हॅट हा कायदा वस्तुंच्या विक्रीवर लागू होतो. जीएसटी कायद्यात हा कर वस्तुंच्या पुरवठ्यांवर लागू होईल. महाराष्ट्र व्हॅट कायदा व काही राज्यांतील व्हॅट कायदा यातील गाभा अर्थात इनपुट टॅक्स, क्रेडिट, मॅच, मिसमॅच, क्रॉस चेकिंग, विक्रिकरणाऱ्याने कर न भरल्यास खरेदीदाराला इनपुट टॅक्स क्रेडीट न मिळणे अशा अनेक तरतदी जीएसटीत समाविष्ट केल्या गेल्या आहे. या पुढे राज्य अंतर्गत पुरवठ्यांवर व्हॅटऐवजी ‘स्टेट जीएसटी’ भरावा लागेल. सामान्य समजुतीनुसार किंवा धारणेनुसार व्हॅटऐवजी ‘स्टेट जीएसटी’ उदाहरणस्तव आपण समजू या ! व्हॅट राज्यस्व, महसूल राज्य शासनाला मिळतो. त्यानुसार ‘स्टेट जीएसटी’ राज्यशासनाकडे जमा होईल. जीएसटीत अंतरराज्य पुरवठ्यावर आयजीएसटी आणि राज्य अंतर्गत पुरवठ्यावर सीजीएसटी आणि एसजीएसटी लागू होतो. जीएसटीच्या रंगात व्हॅटचा गुलाबी रंग जास्त दिसेल.अर्जुन : कृष्णा, सेवाकर व जीएसटीच्या रंगात काय फरक आहे.?कृष्ण : अर्जुना, सेवाकर हा सेवेच्या पुरवठ्यावर लागू होतो. केंद्रशासन यांची आकारणी वसुली करते. जीएसटीत सेवाकराचा रंग जशास तसा उचलेला आहे, असे वाटते. सेवाकरांच्या तरतुदी आणि जीएसटीतील ‘सेवा’संबंधी तत्वे समान आहे, असे वाटते. सेवाकराचा रंग जर हिरवा आहे असे मानले तर तो तसाच हिरवागार रहावा अशी तरतूद जीएसटीत दिसते. सेवाकरऐवजी जीएसटीत अंतरराज्य पुरवठ्यावर आयजीएसटी आणि राज्य अंतर्गत पुरवठ्यावर सीजीएसटी आणि एसजीएसटी लागू होतो.अर्जंन : कृष्णा, एक्साईज आणि जीएसटीच्या रंगात काय फरक आहे?कृष्ण : अर्जुना, एक्साईज ड्युटी (अबकारी कर) हा वस्तुंच्या उत्पादनांवर लागू होतो. उत्पादकाला हा कर भरावा लागतो. उत्पादक पुढे आपला माल वितरकाला विकतो तेव्हा या कराचे क्रेडिट वितरकाला मिळत नाही. जीएसटीत उत्पादनाऐवजी वस्तुंच्या पुरवठ्यावर कर भरावा लागेल हा एक मोठा फरक आहे. केंद्रशासन एक्साईज ड्युटीची आकरणी, वसुली इत्यादी करते. आता जीएसटीमध्ये केंद्रीय जीएसटीच्या स्वरुपात कर येईल असे मानू या! व तो पुरवठ्याच्या प्रत्येक स्तरावर येईल जसे : उत्पादकाकडून ते वितरक, वितरकाकडून दुकानदार, दुकानदारांकडून ग्राहक असे प्रत्येक स्तरावर तो स्तरीय कर लागू होईल व त्याचे क्रेडीटसुध्दा मिळेल. जीएसटीत अंतरराज्य पुरवठ्यावर आयजीएसटी व राज्य अंतर्गत पुरवठ्यावर सीजीएसटी आणि एसजीएसटी लागू होतो. एक्साईजचा रंग पिवळा गृहित आपण धरल्यास हा जीएसटीत फिका पडू शकतो, कारण जीएसटीत पुरवठ्यावर जास्त भिस्त आहे.अर्जुन : जीएसटीच्या चौरंगी होळीत करदात्याने काय बोध घ्यावा.कृष्ण : अर्जुना, जीएसटी हा ‘एक देश, एक कर’ या प्रणालीत अपेक्षित असला तरी यात विविध कर जसे राज्य जीएसटी एसजीएसटी, सीजीएसटी, आयजीएसटी, युटीजीएसटी असे कर लागू होणार आहे. या अगोदर पळवाटा शोधून व्हॅट भरला का? एक्साईज कर भरला की नाही इ. क्रॉस होत नव्हते. जसे होळीत गुलाबी रंग लागल्यास पळून जायचा व उर्वरीत रंग एखाद्याला लागत असे. कर चुकविण्याऱ्याला धरणे अवघड होत असे. किंवा अनेकजण व्यापार करुन सुध्दा कर भरत नव्हते. जसे होळीत तो बेरंग फिरत असे. आता जीएसटीत विविधरंगी होळी आहे. सर्वांनाच या मध्ये खेळावे लागेल. कायद्यानुसार थोडीफार बोंबाबोंब होईल. परंतु नंतर जीएसटी फायदेशीरच ठरेल. कायद्याशी कोणीही खेळू नये, त्या अनुसार होळीत ही आणि जीएसटीतही बेकायदेशीर प्रताप करू नये, सभ्यता, कमी पाणी, घातक रंगाचा वापर न करता, आनंदाने आणि सर्वांना समावून घेवून होळीचा आनंद लुटावा!
जीएसटीची ‘होळी’ चौरंगी; समजून घ्या करांचे रंग कोणते?
By admin | Updated: March 13, 2017 00:31 IST