Join us  

जीएसटी वसुलीत ३.६ टक्क्यांची घट, निम्म्या लोकांनी केला नाही भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 1:58 AM

आॅगस्टमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी एकूण ९0,६६९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवाकर (जीएसटी) वसूल केला. जीएसटीच्या पहिल्या महिन्याच्या तुलनेत (जुलै) हा कर ३.६ टक्क्यांनी कमी आहे.

नवी दिल्ली : आॅगस्टमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी एकूण ९0,६६९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवाकर (जीएसटी) वसूल केला. जीएसटीच्या पहिल्या महिन्याच्या तुलनेत (जुलै) हा कर ३.६ टक्क्यांनी कमी आहे. व्यावसायिकांना नव्या कर व्यवस्थेत रुळायला वेळ लागत असल्यामुळे करवसुलीत घट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या कराच्या आकड्यांत दहा लाखांपेक्षा जास्त असलेल्या छोट्या व्यावसायिकांच्या कराचा समावेश नाही. या व्यावसायिकांबाबत सरकारने उदार धोरण स्वीकारले आहे. निवेदनात म्हटले की, ६.८ दशलक्ष करदात्यांपैकी सुमारे अर्ध्या करदात्यांनीच कर भरणा केलेला आहे. दिलेल्या वेळेत कर आणि विवरणपत्र दाखल करण्याचे बंधन असलेल्यांचाच यात प्रामुख्याने समावेश आहे.- करवसुली कमी होणे हा अभ्यासाचा विषय आहे, असे जाणकारांना वाटते. खेतान अँड कंपनी या विधि संस्थेचे भागीदार अभिषेक ए. रस्तोगी म्हणाले की, ही परिस्थिती धोक्याचा इशारा देणारी आहे.- सरकारने कमी कर भरणा होण्याच्या कारणांच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे.- करदात्यांना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे की, कर लागत नसताना ते आपोआप नव्या व्यवस्थेत स्थलांतरित झाले आहेत, हे शोधून पाहण्याची गरज आहे.- कर भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरही काही लोक व्याजासह भरणा करू शकतात. त्यामुळे या आकड्यात वाढ होऊ शकते.- ज्या करदात्यांची उलाढाल २0 लाखांपेक्षा कमी आहे, अशा अनेक करदात्यांना त्यांची जीएसटी नोंदणी यंत्रणेकडे जमा करावी लागेल. कारण त्यांना करच लागत नाही.