Join us  

७.५ टक्क्यांवर राहणार वृद्धीदर : वित्त सचिव

By admin | Published: October 06, 2015 4:27 AM

महसूल वसुली ५० हजार कोटी रुपयांपेक्षा कमी होणार असली तरी आर्थिक वृद्धीचा दर ७.५ टक्क्यांपेक्षा अधिक राहील, असा विश्वास व्यक्त करताना वित्तीय तूट अंदाजपत्रकीय उद्दिष्टांतर्गत

नवी दिल्ली : महसूल वसुली ५० हजार कोटी रुपयांपेक्षा कमी होणार असली तरी आर्थिक वृद्धीचा दर ७.५ टक्क्यांपेक्षा अधिक राहील, असा विश्वास व्यक्त करताना वित्तीय तूट अंदाजपत्रकीय उद्दिष्टांतर्गत राहील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.भारताचा आर्थिक पाया मजबूत आहे. जगभरातील उलथापालथीमुळे होणाऱ्या परिणामांचा मुकाबला करण्यासाठी आणि आर्थिक विकास आणि समावेशी समृद्धीच्या मार्गावर नेण्याच्या दृष्टीने भारताची स्थिती आधीच्या तुलनेत चांगली आहे, असे वित्त सचिव रतन वटाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी वित्त मंत्रालयाचे अन्य सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागारांनीही भारताच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले.वित्त मंत्रालयासाठी उद्दिष्टापेक्षा महसूल वसुली कमी होणे, ही चिंतेची बाब आहे. प्रत्यक्ष करवसुलीत अपेक्षित वाढ झाल्याने महसूल वसुलीचे प्रमाण अर्थसंकल्पीय उद्दिष्टापेक्षा ५ ते ७ टक्क्यांनी कमी असेल, असे महसूल सचिव हसमुख आधिया यांनी सांगितले. करवसुलीचा आकडा चालू आर्थिक वर्षात १४ लाख कोटींवर जाण्याची शक्यता आहे.आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धीचा दर ७.५ टक्क्यांपेक्षा अधिक असेल. जागतिक मंदी असतानाही भारत जगात तेजीने वृद्धी करणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पुढे आला आहे.