Join us  

व्यावसायिक वातावरण अधिक पोषक करण्याचा सरकारचा विचार

By admin | Published: October 23, 2014 4:55 AM

व्यवसाय आणि उद्योगधंदा सहजतेने सुरू करता यावा, यासाठी यासंबंधीचे नियम-अटी सुलभ करण्याचा सरकारचा विचार असून औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागाने त्यादृष्टीने काही ठोस शिफारशीही केल्या आहेत.

नवी दिल्ली : व्यवसाय आणि उद्योगधंदा सहजतेने सुरू करता यावा, यासाठी यासंबंधीचे नियम-अटी सुलभ करण्याचा सरकारचा विचार असून औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागाने त्यादृष्टीने काही ठोस शिफारशीही केल्या आहेत.कोणताही व्यवसाय करण्यासाठी कंपन्या किंवा संस्थेला नोंदणी करण्यासाठी बराच कालावधी लागत होता. तो कमी करून एक दिवसावर आणावा, तसेच सर्व प्रकारच्या कामगार कायद्यासाठी एक नोंदणी करणे आणि अनेक प्रकारच्या करांची संख्याही कमी करण्यात यावी, अशा सूचना या विभागाने केल्याआहेत.व्यावसायिक वातावरण सुधारण्यासाठी, तसेच भारताचा पतदर्जा सुधारण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या क्षेत्रात तातडीने काय सुधारणा करणे जरूरी आहे, यासाठी औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागाने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी ४६ मुद्यांची यादी तयार केली आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयास सांगण्यात आले आहे की, सध्या यासाठी कंपन्या आणि संस्थांना नोंदणीसाठी २७ दिवस लागतात. हा अवधी एक दिवसाचा करावा. कॅनडा आणि न्यूझीलंडमध्ये एकाच दिवसात नोंदणी केली जाते. दिवाळखोरी कायदा, एकीकृत दिवाळखोरी संहिता, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरणातहत निर्णायक मंडळाची स्थापना, पुनर्वसन आणि निस्तारण प्रक्रियेसाठी एक निश्चित कालावधी ठरविण्याची सूचनाही या मंडळाने केली आहे.करांची संख्या कमी करणे आणि कर आॅनलाईन भरण्याची परवानगी देणे, किचकट कर प्रक्रिया सुलभ करणे, प्रत्यक्ष कर संहिता आणि वस्तू-सेवाकरप्रणाली लागू करणे आणि सेझ विकासकांसाठी किमान पर्यायी कर रद्द करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)