Join us  

खर्चकपातीसाठी सौदी अरेबियाचा इस्लामी कॅलेंडरला अलविदा

By admin | Published: October 04, 2016 4:00 AM

सौदी अरेबियाने खर्चकपात करण्यासाठी इस्लामी हिजरी कॅलेंडरचा त्याग करून, ग्रेगोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला आहे. ग्रेगोरियन

रियाध : सौदी अरेबियाने खर्चकपात करण्यासाठी इस्लामी हिजरी कॅलेंडरचा त्याग करून, ग्रेगोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला आहे. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये महिन्यातील कामकाजाचे दिवस जास्त असल्यामुळे संपूर्ण वर्षात वेतनापोटी दिल्या जाणाऱ्या रकमेत सौदी सरकारची मोठी कपात होणार आहे. अरब न्यूज आणि सौदी गॅझेट या वृत्तपत्रांनी हे वृत्त दिले आहे. कॅलेंडर बदलाला सौदी मंत्रिमंडळाने गेल्याच आठवड्यात मंजुरी दिली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आता सरकारच्या जानेवारी-डिसेंबर या आर्थिक वर्षाला सुसंगत झाले आहेत. १ आॅक्टोबरपासून हे काटकसरीचे उपाय लागू होणार आहेत. सौदी अरेबिया हा जगातील सर्वांत मोठा तेल निर्यातदार देश आहे. गेल्या दोन वर्षांपासून तेलाच्या किमती निम्म्यापेक्षा जास्त घसरल्या आहेत. त्यामुळे सौदी सरकार आर्थिक संकटांना तोंड देत आहे. इस्लामच्या कॅलेंडरमधील महिने चंद्रावर आधारित आहेत. त्यामुळे हिजरी महिन्यात २९ किंवा ३0 दिवस असतात. या उलट ग्रेगोरियन कॅलेंडरमधील महिन्यात फेब्रुवारी वगळता ३0 किंवा ३१ दिवस असतात. ग्रेगरियन कॅलेंडरच्या तुलनेत हिजरी कॅलेंडरमधील दिवस बरेच कमी भरतात. त्यामुळे सौदी सरकारला जास्त वेतन द्यावे लागते. शिवाय ग्रेगोरियन कॅलेंडर जगात सर्वत्र वापरले जाते. काटकसरीचे धोरण म्हणून सौदी अरेबियाने मंत्र्यांच्या वेतनात २0 टक्के कपात केली आहे. कनिष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार गोठविण्यात आले आहेत. सौदीत खासगी क्षेत्राच्या तुलनेत सरकारचे कर्मचारी दुप्पट आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी आहेत, तसेच सुट्ट्याही जास्त आहेत. त्यात आता सरकार सुधारणा करीत आहे. (वृत्तसंस्था)