प्रसाद गो. जोशी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने तूर्तास कायम राखलेले व्याजदर, सुधारलेला रुपया, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खनिज तेलाच्या दरामध्ये झालेली वाढ आणि जगभरातील शेअर बाजारांमधील अनुकूल वातावरणामुळे मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये गेले काही सप्ताह सुरू असलेली वाढ गत सप्ताहामध्येही कायम राहिली. सप्ताहाच्या अखेरीस काही व्याजदरांमध्ये झालेली कपात ही आगामी काळात रिझर्व्ह बॅँकेकडून होऊ शकणाऱ्या व्याजदरातील कपातीची नांदी मानली जात असून, त्याचे परिणाम आगामी सप्ताहात बाजारात दिसून येऊ शकतात.मुंबई शेअर बाजार सतत तिसऱ्या सप्ताहात तेजीत होता. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहामध्ये २३४.७५ अंशांनी वाढून २४७१७.९९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ७६०४.३५ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये त्यात ९४.१५ अंशांनी वाढ झाली आहे.अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक गत सप्ताहामध्ये झाली. या बैठकीत सध्या तरी व्याजदरामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे वर्षभरात केवळ दोनवेळा व्याजदरामध्ये बदल करण्याचा निर्णयही या बैठकीमध्ये झाला. या निर्णयामुळे भारत तसेच अन्य आशियाई देशांमधील परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक कायम राहण्याची शक्यता आहे. त्याची प्रचितीही लगेचच आली. गत सप्ताहामध्ये या वित्तसंस्थांनी भारतीय बाजारात ३३०६.३३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन रुपयाचे मूल्य गत सप्ताहामध्ये वाढलेले दिसून आले. सप्ताहामध्ये ते ०.७१ टक्क्यांनी वाढून डॉलरला ६६.६१ रुपये असे झाले. भारतीय चलनाची मजबुती हे अर्थव्यवस्था स्थिर होऊ लागल्याचे एक लक्षण मानले जात आहे. गेली पाच महिने सातत्याने वाढत असलेला ग्राहक मूल्यनिर्देशांक फेब्रुवारी महिन्यात कमी झालेला दिसून आला.
चांगल्या वातावरणात बाजाराची आगेकूच सुरूच
By admin | Updated: March 21, 2016 02:35 IST