मुंबई : गेल्या वर्षी सोने आयात करात वाढ केल्यानंतर सोन्याची तस्करीही वाढली होती. मात्र कस्टम विभागाच्या सतर्कतेमुळे आता कुरियर कंपन्यांसाठी सोन्याची ने-आण करणे धोकादायक ठरू लागले आहे. त्याचवेळी अशा व्यवहारात गुंतलेल्या टोळ्यांचा नफाही कमी होऊ लागला आहे. त्यामुळे वाढलेल्या तस्करीला काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे.चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी संपुआ सरकारने गेल्या आर्थिक वर्षात सोन्याच्या आयात करात वाढ केली होती. त्याचा परिणाम होउन देशातील सोन्याची आयात घटली होती. स्वाभाविकपणे याचा अर्थव्यवस्थेलाही लाभ झाला. मात्र आयात कर वाढीमुळे सोन्याच्या तस्करीत मोठया प्रमाणात वाढ झाली होती. मात्र आता यात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. कस्टमच्या दक्षता अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. सरकारी यंत्रणांकडून पकडले जाण्याचा धोका आता वाढल्याने कुरीयर कंपन्यांनी याचा धसका घेतला आहे. त्यामुळे आता सोन्याची ने-आण करण्याच्या दरात या कंपन्यांकडून वाढ करण्यात आली आहे.गेल्या वर्षी ज्या कुरीयर कंपन्या १0 ग्रॅम सोन्यासाठी १५0 रूपये आकारत होत्या त्यांच्याकडून आता २८७ रूपये आकारले जात आहेत, असे थॉम्सन रॉयटर्स जीएफएमएसचे विश्लेषक सुधीश नंबियाथ यांनी सांगितले.एखादी कुरीयर कंपनी ४0 हजार डॉलरच्या किंमतीचे १ कीलो सोने आणत असेल तर पकडले न गेल्यास सध्याच्या दराने या कंपनीला ४७0 डॉलरचा फायदा होउ शकतो. मात्र त्याचवेळी स्थानिक बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दर यात फारसा फरक राहिला नसल्याने या व्यवहारातील नफा दिवसेदिवस कमी होत चालला आहे. सुरक्षा व्यवस्था अधिक कडक झाल्याने तसेच कायदेशीर मार्गाने होणारी आयात वाढत असल्याने आता सोन्याच्या तस्करीत तसा फायदा नसल्याचे मत कस्टम विभागाचे अतिरीक्त आयुक्त मिलिंद लांजेवार यांचे म्हणणे आहे.गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत विमानतळावर पकडण्यात आलेले सोने ७0 किलोग्रॅम होते. यावर्षी याच कालावधीत ६0४ किलोग्रॅम सोने पकडण्यात आले. सोन्याच्या तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या क्लृप्त्या बऱ्याचदा एकाच पध्दतीच्या असल्यानेही ही तस्करी पकडणे शक्य होत आहे.
सोन्याची तस्करी घटणार
By admin | Updated: October 22, 2014 05:33 IST