नवी दिल्ली : सोन्याचा भाव ३३0 रुपयांनी घसरून २६,१७0 रुपये तोळा झाला असून हा सोन्याचा तीन महिन्यांचा नीचांक आहे. चांदीचा भाव तब्बल १,५५0 रुपयांनी घसरून ३४,४५0 रुपये किलो झाला आहे. जागतिक बाजारातील नरमाई, तसेच दागिने निर्मात्यांनी कमी केलेली खरेदी याचा परिणाम म्हणून ही घसरण झाल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. चीनमधील शेअर बाजारातील प्रचंड घसरण आणि ग्रीसमधील आर्थिक-राजकीय संकट यामुळे आशियाई बाजारांत खळबळ उडाली आहे. त्याचा थेट परिणाम जागतिक सराफा बाजारावर झाला आहे. जागतिक सराफा बाजाराने मार्चनंतरची सर्वाधिक नीचांकी पातळी गाठली आहे. भारतातील सराफा बाजारांचा कल ठरविणाऱ्या सिंगापूर येथील बाजारात सोन्याचा भाव 0.७ टक्क्यांनी घसरून १,१४७.३९ डॉलर प्रति औंस झाला. १८ मार्चनंतरची ही सर्वाधिक नीचांकी पातळी ठरली आहे. चांदीचा भाव १.७ टक्क्यांनी घसरून १४.८१ डॉलर प्रति औंस झाला आहे. जागतिक बाजारातील कल लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरील दागिने निर्माते आणि किरकोळ खरेदीदार यांनीही हात आखडता घेतला आहे.तयार चांदीचा भाव १,५५५0 रुपयांनी घसरून ३४,४५0 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १,८४0 रुपयांनी घसरून ३४,१६0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ५३ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५४ हजार रुपये प्रति शेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने ३ महिन्यांच्या नीचांकावर
By admin | Updated: July 8, 2015 23:28 IST