Join us  

लग्नसराईच्या खरेदीने सोन्याच्या भावात तेजी

By admin | Published: April 25, 2015 1:02 AM

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात लग्नसराईची खरेदी झाल्याने सोन्याच्या भावात सुधारणा नोंदली गेली.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात लग्नसराईची खरेदी झाल्याने सोन्याच्या भावात सुधारणा नोंदली गेली. आज सोन्याचा भाव १९० रुपयांनी वधारून २७,१९० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. दुसरीकडे औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या जोरदार मागणीने चांदीचा भावही २५० रुपयांनी उंचावून ३६,५०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. बाजारातील जाणकारांनी सांगितले की, लग्नसराईची मागणी पूर्ण करण्यासाठी सराफा व्यापाऱ्यांनी जोरदार खरेदी केली. जागतिक बाजारातही तेजीचा कल होता. परिणामी स्थानिक बाजारधारणेत सकारात्मक कल नोंदला गेला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आयात महाग झाली, याचाही बाजार धारणेवर परिणाम झाला. न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव ०.५६ टक्क्यांनी वाढून १,१९३.५० डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव ०.५७ टक्क्यांनी वधारून १५.८५ डॉलर प्रतिऔंसवर गेला. तयार चांदीचा भाव २५० रुपयांच्या सुधारणेसह ३६,६५० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही १९५ रुपयांनी वधारून ३६,१३५ रुपये प्रतिकिलो झाला. दुसरीकडे चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५५,००० रुपये व विक्रीकरिता ५६,००० रुपये प्रतिशेकड्यावर स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)